बीड : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण खुपच वाढले आहे. बांधकाम परवानगीसाठी नगर रचनाकाराच्या सांगण्यावरुन 30 हजारांची लाच स्विकारताना खाजगी अभियंता यास रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड एसीबीने बीड नगर परिषदेच्या आवारात बुधवारी (दि.30) सायंकाळी करण्यात आली.
अंकुश जगन्नाथ लिमगे (वय 30 रा.नाईकनगर नांदेड) असे लाचखोर नगर रचनाकाराचे नाव आहे. त्यांच्याकडे शिरुर नगर पंचायतचा अतिरिक्त पदभार असून आहे. तसेच इझारोद्दीन शेख मैनोद्दीन (वय 28, रा.शिरुर) असे खाजगी अभियंताचे नाव आहे. तक्रारदार यांनी शिरुर कासार येथे घराचे बांधकामासाठी अक्रुशक क्षेत्र सुमारे 6737 चौरस फुट सहान जागा खरेदी केली. त्या जागेची गुंठेवारी देखील करण्यात आली होती. त्यानंतर जागेचा संयुक्त मालक या नात्याने बांधकाम परवानगी मिळण्यासाठी खाजगी अभियंता शेख ईझारोद्दीन यांचे मार्फत 14 जुलै रोजी बीपीएमएस पोर्टलवर अॅानलाईन अर्ज केला होता. पंंरतू यातील नगर रचनाकार अंकुश लिमगे याने 22 जुलै रोजी त्रुटी काढत पुनर्रपडताळणीसाठी प्रलंबित ठेवला. तसेच खाजगी अभियंता यांचे मार्फतीने तक्रारदार यांना 40 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडअंती 30 हजार रुपये खाजगी अभियंता याकडे देण्यास सांगितले. बीड नगर परिषदेसमोर खाजगी अभियंता ईझारोद्दीन यास 30 हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर अंकुश लिमगे यासहही ताब्यात घेतले असून दोघांवर बीड शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक शंकर शिंदे, हनुमान गोरे, संतोष राठोड, अमोल खरसाडे, श्रीराम गिराम, भरत गारदे, अविनाश गवळी यांनी केली.