indian-air-forces

चीनचा मुकाबला करण्यासाठी भारताचे हवाई दल सज्ज

देश विदेश न्यूज ऑफ द डे

हैदराबाद: चीनलगतच प्रत्यक्ष ताबारेषेवरील स्थितीविषयी आम्हाला पूर्ण जाणीव असून तेथील कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे भारतीय हवाईदलाचे प्रमुख आरकेएस बहादुरिया यांनी म्हटले आहे. दुंडीगल येथील हवाईदलाच्या अकादमीतील दीक्षांत समारंभात तेथील छात्रांपुढे बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
ते म्हणाले की, गलवान खोर्‍यात भारतीय जवानांनी जे बलिदान दिले ते आम्ही वाया जाऊ देणार नाही. कोणत्याही स्थितीला सामोरे जाण्याची तयारी आम्ही ठेवली आहे, असे त्यांनी नमूद केले. आमच्या सिद्धतेविषयी कोणतीही शंका मनात बाळगण्याचे कारण नाही. आम्ही तैनातीसाठी सज्ज आहोत. आम्ही आमचे सर्व कसब पणाला लावू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले की, तेथील स्थितीचे पूर्ण विश्लेषण आम्ही केले आहे. त्यामुळे कोणत्या स्थितीत काय सिद्धता ठेवावी लागेल याची सारी रणनीती आम्ही आखली असून त्यानुसार आम्ही आमची सिद्धता ठेवली आहे. चीनच्या स्थितीचाही आम्ही आढावा घेतला आहे. असे नमूद करून ते म्हणाले की, त्यांची कारवाई कोठून होऊ शकते आणि त्यांनी त्यांची काय सिद्धता ठेवली आहे याचाही अभ्यास झाला आहे, असे हवाईदल प्रमुखांनी सांगितले. तथापि, सध्याच्या स्थितीत प्रत्यक्ष ताबारेषेनजीक जो वाद निर्माण झाला आहे तो शांततेने सुटेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. चीनकडून दरवर्षीच वादग्रस्त भागात लष्करी हालचाली होतात. पण यावेळी त्यांच्या या हालचाली मोठ्या आहेत आणि तेथील स्थितीत त्यांनी काही बदल केले आहेत. त्यामुळे तेथील कोणत्याही आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी आपल्यालाही लष्करी पातळीवर कायमच आता सज्जता बाळगावी लागेल, असे ते म्हणाले.