KAIJ-photo

सभागृहास मंजूरी केजला, काम मात्र बीड तालुक्यात; चौकशी सुरू

केज न्यूज ऑफ द डे

केज : तालुक्यातील देवगाव येथील रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठाणअंतर्गत सारूळ (ता.केज) येथे 25 लाखांच्या सभागृह बांधकामात भ्रष्टचार झाल्याच्या तक्रारींवरून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी (दि.10) चौकशीला सुरुवात केली. यावेळी बीडचे कार्यकारी अभियंता श्री.हाळीकर, केजचे उपअभियंता श्री.खेडकर, तक्रार तथा पंचायत समिती सदस्य पिंटु ठोंबरे, जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे आदींची उपस्थिती होती.

   सन 2017-2018 मध्ये सारूळ (ता.केज) येथे खा.रामदास आठवलेंच्या फंडातून सामाजिक सभागृहाच्या बांधकामासाठी 25 लाखांचा निधी देण्यात आला होता. या सभागृहाच्या मंजूर असलेल्या मोकळ्या जागेची चौकशी अधिकार्‍यांनी पाहणी करुन प्रत्यक्षात काम असलेल्या ठिकाणाचीही पाहणी केली. त्यानंतर अखेर वादग्रस्त सभागृह बीड तालुक्यात सापडले. सभागृह बांधकामास प्रशासकीय मंजूरी व जोडण्यात आलेले महसूली दस्तऐवज हे केज तालुक्यातील सारूळ ग्रामपंचायत हद्दीतील आहेत. प्रत्यक्षात काम मात्र बीड तालुक्यातील धावज्याचीवाडी ग्रामपंचायत हद्दीत झाले असल्याचे उघडकीस आले असून कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. यापूर्वी सारुळ ग्रामपंचायत कार्यालयाने आपल्या हद्दीत असे कोठेही काम झाले नसल्याचे लेखी दिलेले आहे. येत्या दोन दिवसात चौकशी अहवाल सादर करणार असल्याचे चौकशी अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी सांगितले आहे.

अधिकार्‍यांकडे संचिका नसताना चौकशी!
कामाच्या चौकशीसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बीडचे कार्यकारी अभियंता, केजचे उपअभियंता, शाखा अभियंता, सरपंच, ग्रामसेवक, तक्रारदार यांनी दस्तऐजवांसह हजर राहण्याच्या सूचना केल्या होत्या. चौकशीला आलेल्या अधिकार्‍यांकडे दस्तऐवज नसताना चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे.

संचिका गायब करणारा ‘तो’ व्यक्ती कोण?
पिंटु ठोंबरे हे कामाच्या मुळ संचिकेची लेखी मागणी गत सहा महिन्यापासून करत आहेत. कार्यकारी अभियंता श्री.हळीकर यांनी आज-उद्या देतो असे म्हणत अद्याप संचिका दिलेली नाही. ही संचिका एका जिल्हा परिषद सदस्याच्या सांगण्यावरून खाजगी कर्मचार्‍याने नेली असल्याचे कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, संचिका 6 महिन्यापासून गायब आहे, याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची लेखी मागणी पिंटु ठोंबरे यांनी केली आहे.

मंगल कार्यालयाचा उल्लेख; शुभ
कार्यालयासाठी बुकिंग चालू आहे!
रेणुकामाता कृ.वि.प्रतिष्ठाण, देवगाव अंतर्गत मौजे सारूळ (धावज्याचीवाडी) अंबळाचा बरड (ता.केज) गट नं.21-ई यांच्या मालकीच्या जागेत समाजपयोगी सभागृहास बांधकाम करणे या नावाने प्रशासकीय मान्यता आहे. प्रत्यक्षात मात्र धावज्याचीवाडी (ता.बीड) गट नं.155 मध्ये विजयकांत विक्रम मुंडे यांच्या नावे असलेल्या एका अन्य खाजगी कंपनीच्या जागेत सभागृह बांधकाम केले आहे. परंतू ही जागा शेतकर्‍यांकडून संस्था उभारणीच्या नावाखाली घेण्यात आली होती. तो उद्देश देखील पूर्ण झाला नसून शेतकर्‍यांची व शासनाची याठिकाणी फसवणूक करण्यात आली आहे. तसेच, सभागृहाकडे जाणारा रस्ता दर्शविणार्‍या फलकावर मंगल कार्यालयाचा उल्लेख असून खासदारांचे नाव देखील नाही. ‘शुभ कार्यालयासाठी बुकिंग चालू आहे’ असा फलक आहे.

आम्ही भ्रष्टाचार केला नाही -विजयकांत मुंडे
सभागृहाचे बांधकाम हे सारूळ आणि धावज्याचीवाडी सिमेवर झाले आहे. 25 लाखांचा निधी मंजूर होता, आम्ही एकूण 50 लाख खर्च करुन काम पूर्ण केले. यात कुठेही भ्रष्टाचार केलेला नाही. माझ्यावर आणि वडिलांवर तत्थहीन आरोप करण्यात येत आहेत. आजपर्यंत आमच्यावरील एकही आरोप सिद्ध झालेला नाही, असे जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना सांगितले.

Tagged