ग्रामपंचायतींना थर्मल गन, पल्स ऑक्सीमीटर खरेदी करावे लागणार

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : कोरोनाला रोखण्यासाठी बीड जिल्हा परिषदेने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना आता थर्मल गन, पल्स ऑक्सीमीटर खरेदी करण्याच्या सूचना बीड जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने पत्राद्वारे गटविकास अधिकार्‍यांना गुरुवारी दिल्या आहेत. खरेदीसाठी दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे अनियमिता होण्याची शक्यता कमी असली तरीही तसे झाल्यास सरपंच, ग्रामसेवकावर थेट कारवाई करण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे.

  जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आलेल्या पत्रात पुढे म्हटले की, बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी उपलब्ध असलेल्या 14 व्या व 15 व्या वित्त आयोगातील निधीमधून थर्मल गन, पल्स ऑक्सीमीटर खरेदी करावे. ही खरेदी करण्यासाठी नियमावली देखील सोबत दिली असून त्यात म्हटल्याप्रमाणे, साहित्य गुणवत्तापूर्ण व ठरवून दिलेल्या मानकानुसारच खरेदी करावे. ग्रामपंचायतने खरेदीचा साठा नोंदवहीत घेऊन ते अंगणवाडी सेविकांना वाटप करावे. यात अनियमितता आढळून आल्यास नियमानुसार थेट सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा पत्राद्वारे देण्यात आला आहे.

असे आहेत निश्चित केलेले दर
थर्मल गन 1 हजार 180 तर पल्स ऑक्सीमीटर 950 रूपये प्रमाणे खरेदी कराव्यात अशा सुचना दिल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

Tagged