navari palun geli

लग्नाच्या ‘त्या’ रात्री बेपत्ता झालेली नवरी सापडली

क्राईम न्यूज ऑफ द डे मराठवाडा

पैठण ः पैठण येथील एका विधवा महिलेच्या मुलासोबत लग्न केल्यानंतर ‘त्या’ रात्री बेपत्ता झालेली नवरी अखेर सापडली आहे. पोलीसांनी तिचा परभणी येथे शोध घेतला असून ती आपल्या पहिल्या पतीकडे परत गेल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी तिला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरु आहे.

उषा उर्फ मानसी पवार असे त्या नवरीचे नाव आहे. पैठण येथील लक्ष्मीनगर भागात राहणार्‍या सुनंदाबाई कारभारी वनसारे या विधवा महिलेच्या मुलाचे लग्न बर्‍याच दिवसापासून होत नव्हते. या महिलेने शेख नुर महंमूद (रा.तेलवाडी ता.पैठण) यास पाच हजार रुपये देऊन नवरी पाहण्यास सांगितले. त्यामुळे जालना येथील एका गरीब कुटुंबातील मुलगी आहे. परंतु मुलीच्या बहिणीला व मेव्हण्याला 50 हजार रुपये दिल्यास ते लग्नासाठी तयार होतील असे सांगितले. सुनंदाबाई वनसारे यांनी आपला मुलगा कृष्णा कारभारी वनसारे याचे कुठल्याही परिस्थितीत हात पिवळे करायचे म्हणून उसनवारीवर पैसे जमा करून सदरील नवरीची बहिण पुजा पवार व मेव्हणा राजू पवार रा.जालना यांना पैठण येथील बैठकीमध्ये 50 हजार रुपये दिले. कृष्णा व उषाचा विवाह दि.15 रोजी साध्या पद्धतीने पार पडला. अनेक ठिकाणी स्थळ पाहिल्यानंतर कृष्णाला पत्नी मिळाल्यामुळे परिवारातील सगळ्यांनाआनंद झाला होता. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधू अंगावर सोन्याचे मंगळसूत्र, पायातील चांदीचे चैन पट्टी, जोडवे असे 70 हजार रुपयाचे दागिने व पन्नास हजार रुपये रोख असे सगळेच घरातून गायब असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले. तिची सगळीकडे शोधाशोध करुनही ती न सापडल्यामुळे वनसरे यांनी पोलीसात धाव घेतली. या प्रकरणी तक्रार नोंद करण्यात आली. आरोपी नवरी परभणीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पैठण पोलीस ठाण्याचे पोनि.भगिरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि.सचिन सानप, पोशि.वाल्मीक बनगे, दोन महिला होमगार्ड यांच्या विशेष पथकाने अखेर नवरीचा शोध घेत तिला ताब्यात घेतले.

कार्यारंभच्या वाचकाने थेट
कार्यारंभ कार्यालयाशी संपर्क केला

लग्नाच्या पहिल्याच दिवशी नवरी बेपत्ता झाल्याची बातमी कार्यारंभ लाईव्हवर प्रकाशित करण्यात आली होती. ही बातमी परभणी येथील एका वाचकाने वाचल्यानंतर त्यांनी ‘कार्यारंभ’शी संपर्क केला. सदरील बेपत्ता नवरी ही परभणीमध्ये असल्याचे सांगितले. त्यानंतर ‘कार्यारंभ’ने पैठण पोलीसांना याची माहिती दिली. यावरुन पैठण पोलीसांनी परभणी गाठत आरोपी नवरील अटक केली.

टोळीतील अन्य आरोपी फरार
या प्रकरणामध्ये नवरी नवरी उषा उर्फ मानसी पवार हिला अटक करण्यात आली आहे. विवाह करुन फसवणूक करणारी ही टोळी आहे. यामधील बनावट बहिण पूजा पवार, बनावट मेहुणा राजू पवार यांच्यासह यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे. त्या आरोपींना लवकरच अटक केली जाणार असल्याचे पैठण पोलीसांनी सांगितले.

विवाह करुन अनेकांना गंडा
आज स्थितीला अनेक तरुणांना बायका मिळत नाही. असेच एखादे कुटूंब पकडून त्यांच्याकडे मुलगी दाखवून पैशांची मागणी करायची. त्यानंतर विवाह करायचा व विवाहानंतर रक्कम, दागिणे घेवून फरार व्हायचं असा प्रकार ही टोळी करीत असल्याचा संशय पोलीसांना आहे. त्या दृष्टीने तपास सुरु आहे.

Tagged