‘पापा’चा घडा फुटला!

अंबाजोगाई न्यूज ऑफ द डे

बीड : ‘मी म्हणजेच अंबाजोगाई’ असे म्हणून नगर परिषदेचा कारभार चालविणारे नगरसेवक राजकिशोर मोदी यांच्या ‘पापा’चा घडा जिल्हाधिकार्‍यांच्या एका निकालाने आज फुटला आहे. नगराध्यक्ष रचना सुरेश मोदी, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजकिशोर मोदी, तत्कालीन मुख्याधिकारी, तसेच नगररचनाकार अंबाजोगाई या चौघांनी चक्क आरक्षीत जागेचं आरक्षण हटवून त्यावर प्लॉटिंग पाडली. कागदावरील जागा कमी असताना प्रत्यक्षात मात्र सरकारी जागेत अतिक्रमण करून तीही जागा प्लॉटिंगमध्ये घेतली. याबाबत नगरपरिषदेतील ठराव झालेले नसताना तसे कागदोपत्री दाखवून कोट्यवधी रुपयांचं आयतं लोणी खाऊ पाहणार्‍या बोक्यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दणका देत प्लॉटिंगचं रेखांकन रद्द केलं आहे. याबाबत आ.नमिताताई मुंदडा यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

या घोटाळ्याची थोडक्यात माहिती अशी की, अंबाजोगाई येथे तहसील रोडवरील मंडी बाजार सुरु होण्याच्या ठिकाणी सर्वे नं.358 आणि 359 मध्ये 2 एकर 13 गुंठे देवस्थानची जमीन होती. मात्र या जमीनीवर शॉपिंग कॉम्प्लेक्सचे आरक्षण टाकण्यात आले होते.राजकिशोर मोदी यांनी 30 नोव्हेंबर 2018 रोजी झालेल्या सर्व साधारण सभेत इतर विषयात घेतलेला बनावट ठराव क्र. 148 आढळून आला. त्यात सर्वे क्रं.358, 359 मधील 3/48 आरक्षण क्रमांक 78 (ए) चे स्थानांतरणबाबतचा होता. सदर जमीन नगराध्यक्ष रचना मोदी यांचे पती सुरेश प्रकाश मोदी यांच्या मालकीची असल्याचे दिसून आले. त्या जमीनीच्या ठरावाचे सुचक म्हणून राजकिशोर कांताप्रसाद मोदी नाव दिसून येत होते. परंतु त्या दिवशीच्या हजेरीपटामध्ये राजकिशोर मोदी हे गैरहजर राहीले होते. तरीही त्यांचे नाव सुचक म्हणून ठरावात टाकण्यात आले. तर ठरावाला अनुमोदक म्हणून नगरसेवक शेख रहीम शेख रज्जाक यांचे नाव टाकण्यात आले होते. परंतु असा कुठलाही ठराव सभेसमोर नव्हता आणि त्याला आपण अनुमोदन दिलेले नाही, असे शपथपत्र शेख रहीम यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे दिलेल्या तक्रारीत दिले आहे. त्यात रहीम यांनी म्हटले की, मुख्याधिकारी, नगररचनाकार नगर परिषद अंबाजोगाई, नगराध्यक्ष व नगरसेवक राजकिशोर मोदी यांनी संगनमत करून अर्ज सादर केलेला आहे. त्यावर नगर परिषदेने बेकायदेशीरपणे तत्परता दाखवून सुरेश मोदी यांचे हित जपण्यासाठी पाठपुरावा केला आहे. अशाप्रकारे स्थानांतराचा एखादा ठराव घेताना तो सभेपुर्वी विषय पत्रिकेमध्ये घ्यावा लागतो. सर्व सदस्यांना तशी नोटीस पाठवावी लागते. मात्र यात असे काहीही झाले नाही. सर्व नगरसेवकांना अंधारात ठेऊन स्वतःच्या फायद्यासाठी नगर परिषदेचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाची सुनावनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.
जयवंती नदीचा केला नाला; जिल्हाधिकार्‍यांनी नोंदवले गंभीर आक्षेप
ज्या सर्वे नंबरचा सर्व घोटाळा करण्यात येत होता त्याच सर्वे नंबरच्या उत्तर बाजुने ही नदी वाहते. या नदीस नगराध्यक्ष रचना मोदी, नगरसेवक राजकिशोर मोदी यांनी बेकायदेशीरपणे, कुठलीही परवानगी न घेता 15 मीटरची नदी 9 मीटरचा नाला असल्याचे दाखवून या नाल्याला संरक्षक भींत बांधण्याचा उपद्रव्याप केला. त्यामुळे नदीचे पात्र कमी होऊन भविष्यात अंबाजोगाईकरांना मोठ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागेल. जिल्हाधिकार्‍यांनी ही भिंत देखील पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले की नदी असतानाही त्याचा उल्लेख नाला केला. नदीची रुंदीही कमी केली. मोजपट्टा, हरीतपट्टा बदलण्यात आला. हरीतपट्टे लेआऊटमध्ये दाखविले नाहीत. एक्झिस्टिंग स्ट्रक्चर सर्व ठिकाणी दाखविण्यात आलेले नाहीत. प्रत्यक्षात नकाशावर लिहीलेले क्षेत्र चुकीचे दाखविण्यात आले. नदीचे क्षेत्र वेगवेगळे दर्शविलेले नाही. रामचंद्र मंडी बाजार यांचे क्षेत्र सातबार्‍याप्रमाणे जुळत नाही. सदर प्लॉटिंगवर ओपन स्पेस देखील ठेवला नाही.
शासकीय जागा बळकावली
जिल्हाधिकार्‍यांनी आपल्या आदेशात म्हटले की, ज्या जमीनीवर रेखांकन टाकण्यात आले त्या जमीनीवर कुठेही शासकीय जागा म्हणून दाखविण्यात आले नाही. सरकारी जागेवरच रेखांकन टाकण्यात आले. ही बाब अतिशय गंभीर आहे. सातबारावर हे क्षेत्र असतानाही खात्री न करता परवानगी देण्यात आली. त्यामुळे या जागेचा सादर केलेला नकाशाच जिल्हाधिकार्‍यांनी अवैध ठरविला आहे. याचाच अर्थ नगराध्यक्षांनी व इतरांनी शासकीय जागा बळकावल्याचे दिसत आहे.
अधिकार्‍यांची चौकशी, अनाधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश
तत्कालिन मुख्याधिकारी सुधाकर जगताप, नगररचनाकार अजय कस्तुरे, यांच्यावर तत्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव नगर रचना विभागाकडे पाठविण्यात यावा असे म्हटले आहे. शिवाय फुंदे यांनी सुरेश मोदी यांच्याकडून घेतलेल्या 3659 मी जागेवर अनाधिकृत बांधकाम निवासी व कमर्शिअल केल्याचे दिसून येते. सदरील अनाधिकृत बांधकाम तत्काळ पाडण्याची कारवाई मुख्याधिकारी यांनी करावी. उपजिल्हाधिकारी (सामान्य) यांनी तत्काळ तत्कालिन नगर रचनाकार राम लक्ष्मण चारठाणकर याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच अधिक्षक भुमीअभिलेख यांनी यातील दोषी कर्मचार्‍यांविरूध्द शिस्तभंगाची कारवाई करावी व संयुक्त चौकशी अहवाल पाठवून गंभीर शिक्षेची शिफारस करावी, असे जिल्हाधिकार्‍यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
28 कोटी 50 लाखाचा व्यवहार?
या संपूर्ण प्रकरणात कागदोपत्री अफरातफर करीत ही जागा एका बिल्डराला विकण्यात आली होती. त्यात 28 कोटी 50 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याची सुत्रांची माहिती आहे. जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या निर्णयानंतर भुखंडावर टपून बसलेले ‘बोके’ या निर्णयामुळे एकदम थंडगार पडले आहेत.
सारंग पुजारी, शेख रहीमभाईंचा पाठपुरावा
अंबाजोगाईचे माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, शेख रहीम भाई यांच्या दोन वर्षापासूनच्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यांनी अनेक तक्रारी, मंत्रालयीन स्तरासह आयुक्तालयापर्यंत पाठपुरावा करून राजकिशोर मोदी यांना दणका दिला आहे. अशी मोदींवरील कार्यवाहीची पहिलीची वेळ असावी.
—-
नगराध्यक्ष रचना मोदी, नगरसेवक तथा न.प.चे गटनेते पापा मोदी यांच्यासह त्यांच्या काही सहकार्‍यांनी नगर रचनाकार कस्तुरे यास हाताशी धरून असे अनेक गैरप्रकार केले आहेत. शहरात बेकायदा इमारती उभारण्यात यांचा हात आहे. याप्रकरणात दोन वर्षापासून तक्रारी करून माझा व काही नगरसेवकांचा पाठपुरावा सुरु होता. सर्वांच्या प्रयत्नाला यश आले असून भ्रष्ट नेत्यांना आता चाप बसेल अशी अपेक्षा आहे.
-राजेश वाहुळे, मराठवाडा अध्यक्ष, युवक, लोजप

Tagged