arrested criminal corona positive

बर्दापूर येथील पुतळा विटंबना; आरोपी वडवणीतून केला अटक

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

दारुच्या नशेत कृत्य केल्याची आरोपीची कबुली


प्रतिनिधी । अंबाजोगाई
दि. 31 ः बर्दापूर येथील पोलीस ठाण्याजवळच असलेल्या महापुरुषाच्या पूर्णाकृती पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. तीन दिवसानंतर शुक्रवारी (दि.30) रात्री या घटनेतील आरोपीला अटक करण्यात पोलीसांना यश आले. त्याच्यावर दाखल गुन्ह्यात अ‍ॅट्रॉसिटी कलमाची वाढ करून अंबाजोगाई सत्र न्यायालयासमोर हजर केले असता त्या आरोपीस पाच दिवसाची (दि.4 नोव्हेंबर पर्यंत) पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
महापुरुषाच्या पूर्णाकृती पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. पोलीस ठाण्याजवळच घटना घडल्यामुळे पोलिसांना मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले. ठिकठिकाणी आंदोलने सुरु झाली. बर्दापूरसह अंबाजोगाई शहरात एक दिवस बंद पाळण्यात आला. त्यामुळे या घटनेतील आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे दडपण पोलिसांवर होते. अखेर तीन दिवस जंग जंग पछाडल्यानंतर आणि अनेक लोकांची चौकशी, सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर बर्दापूर येथील सय्यद बशारत सय्यद बाबू (वय 42) यानेच हा प्रकार केल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस आले. शुक्रवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास त्याला वडवणी जवळून अटक करण्यात आली. घटनेच्या दिवसापासून सय्यद बशारत हा फरार होता. त्याच्या विषयीचा संशय बळावल्याने पोलिसांनी सर्वत्र त्याचा शोध सुरु केला होता. तपासादरम्यान तो वडवणीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, अपर अधीक्षक सुनिल लांजेवर, उपअधीक्षक सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे यांनी पीएसआय जमादार, बीट अंमलदार रोडे आणि पोना. चेवले यांच्या पथकाला वडवणीकडे पाठविले. वडवणीपासून चार किमी अंतरावर सध्या काम सुरु असलेल्या एका वॉटर प्लांटमध्ये लपलेल्या सय्यद बशारत याला पोलिसांनी ताब्यात घेतले. बर्दापूर येथे आणून पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दारूच्या नशेत सदरील कृत्य केल्याची कबुली दिली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. सय्यद बशारत हा सध्या परळीत वास्तव्यास असतो. तो गुन्हेगारी वृत्तीचा असून लॉकडाऊन पासून तो बर्दापुरात राहण्यासाठी आला होता. शनिवारी दुपारी बर्दापूर पोलिसांनी सय्यद बशारतला अंबाजोगाई जिल्हा व सत्र सत्र न्यायालयासमोर हजर केले. न्या. सुरवसे यांनी त्याला 4 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Tagged