सासरा प्रदेशाध्यक्ष, जावई युवक प्रदेशाध्यक्ष

न्यूज ऑफ द डे बीड

जानकरांचा ‘रासप’ एका घरापुरता मर्यादित

बीड : धनगर समाजाचे नेते तथा माजी मंत्री महादेव जानकर हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या रासपच्या प्रदेशाध्यक्षपदी गंगाखेड मतदारसंघाचे वादग्रस्त आमदार रत्नाकर गुट्टे यांची शुक्रवारी (दि.30) मुंबई येथून निवड जाहीर करण्यात आली. त्यांचेच जावई राजाभाऊ फड हे रासपच्या युवक आघाडीचे तब्बल 5 वर्षापासून प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे महादेव जानकरांचा पक्ष हा एका घरापुरता मर्यादित राहिला असून सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

   तारूण्यात असताना मोठ्या संघर्षातून व चळवळीतून राजकारणात आलेल्या महादेव जानकरांच्या रासपच्या स्थापनेनंतर सुरुवातीचा काळ वगळता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळाल्याचे क्वचितच दिसून येते. रासप सर्वसामान्यांचा पक्ष आहे असं सांगणार्‍या महादेव जानकरांचा पक्ष आता धनदांडग्या पदाधिकार्‍यांपुरता व एका घरापुरताच मर्यादित राहत आहे. 2016 साली परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील राजाभाऊ फड हे रासपच्या युवक आघाडीच्या प्रदेशाध्यपदी विराजमान झाले. तेव्हा त्यांचे वय 36 वर्षे होते, आज ते 40 वर्षीय आहेत. त्यांच्या नियुक्तीनंतर कार्यकारिणीत साधे फेरबदल देखील झाल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे पक्षातील युवा कार्यकर्ते पक्षापासून दुरावत आहेत. तसेच अन्य पक्षातील युवक व युवा पदाधिकारी हे रासपमध्ये काम करण्यास इच्छुक असूनही पक्षात येण्यास धजावत नाहीत, असे पक्षातील पदाधिकार्‍यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. अगोदरच पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते अवस्थ असताना आता पुन्हा महादेव जानकरांनी राजाभाऊ फड यांचे सासरे आणि पक्षाचे आमदार असलेल्या रत्नाकर गुट्टे यांना प्रदेशाध्यक्षपदी विराजमान केले आहे. तसेच, अंबाजोगाईचे बाळासाहेब दोडतले यांची रासपच्या मुख्य महासचिवपदी निवड करण्यात आली. मुंबई येथील नरिमन पॉइंटच्या रासपा कार्यालयात शुक्रवारी सकाळी 11 वाजता झालेल्या राष्ट्रीय बैठकीत त्यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष सिध्दप्पा अक्कीसागर, पक्षाचे मुख्य महासचिव बालासाहेब दोडतले यांची उपस्थिती होती. दरम्यान, आमदार रत्नाकर गुट्टे हे जनतेतून निवडून आलेले असले तरी त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे व आरोप आहेत. ती प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. त्यामुळे ते सातत्याने चर्चेत असतं, आता त्यांची रासपच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांचे नाव पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेत येईल.

बीड जिल्ह्यात कुठेही आनंदोत्सव नाही?
महादेव जानकर यांचे बीड जिल्ह्यावर विशेष लक्ष असते. त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रत्नाकर गुट्टे यांची निवड जाहीर केल्यानंतर निवडीचा बीड जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात तरी कुठेही आनंदोत्सव साजरा करण्यात आल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यात पदाधिकार्‍यांमध्ये नाराजी आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी अंबाजोगाईचे रासपचे महासचिव बाळासाहेब दोडतले, जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचे भ्रमणध्वनी बंद असल्याने बाजू समजू शकली नाही.

40 वर्षीय व्यक्ती युवक असू शकतो का?
रासपचे युवक प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड हे 40 वर्षीय आहेत. युवक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाली, तेव्हा ते 36 वर्षाचे असावेत. आज त्यांचे वय चाळीशीच्या घरात आहे, असा व्यक्ती युवक असू शकतो का? असा सवाल रासपचे सामान्य कार्यकर्ते विचारत आहेत.

परमेश्वर वाघमोडेंसारख्या निष्ठावंतास संधी मिळावी
गेवराईचे ह.भ.प.परमेश्वर महाराज वाघमोडे हे रासपचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षातील राज्यस्तरीय कार्यकारिणीत संधी मिळायला हवी अशी भावना रासपच्या सामान्य कार्यकर्त्यांनी बोलावून दाखविलेली असताना देखील त्यांचा महादेव जानकरांनी अद्याप विचार केलेला नाही.

Tagged