majalgaon nagar parishad

चाऊस की शेख कोणाचा अर्ज होणार ‘मंजूर’?

न्यूज ऑफ द डे माजलगाव राजकारण

माजलगावकरांचे निकालाकडे लक्ष

माजलगाव, दि.6 : माजलगावच्या नगर परिषद राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी लादलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानुसार भाजपच्या रेश्मा मेंडके यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार शेख मंजूर यांचा एकमेव अर्ज शिल्लक आहे. त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी आहे. पण तत्पुर्वी चाऊस यांनी आपल्या बडतर्फी विरोधात राज्याच्या नगरविकास विभागाकडे अपिल केले होते. पण राज्य शासन या अपिलावर सुनावनी घेत नव्हते. त्यामुळे चाऊस यांनी हायकोर्टात धाव घेतली. खंडपीठान शुक्रवार (दि.6 नोव्हेंबर) पर्यंत सुनावणी पूर्ण करून निकाल कळवावा असे आदेश राज्य शासनाला दिलेले आहेत. त्याची मुदत आज रात्री संपत आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी माजलगाव नगराध्यक्ष निवडीसंदर्भात निकाल येऊ शकतो. त्यानंतरच माजलगावचा नगराध्यक्ष शेख की चाऊस? यांच्यावर अधिकृत ‘मंजुरी’ची मोहोर उमटणार आहे.

माजलगावचे सहाल चाऊस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने त्यांना जवळपास सह महिने जेलमध्ये रहावे लागले होते. दरम्यानच्या काळात नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे धाव घेत, सहाल चाऊस हे सलग तीन महिने गैरहजर राहील्याने त्यांना नगराध्यक्ष पदावरून बडतर्फ करावे, अशी मागणी केली होती. जिल्हाधिकार्‍यांनी त्यांवर सुनावनी घेत त्यांना बडतर्फ केले होते.
जिल्हाधिकार्‍यांच्या या निकालाविरोधात सहाल चाऊस यांनी राज्याच्या नगर विकास मंत्र्यांकडे अपिल केले होते. मात्र नगर विकास विभागाने या प्रकरणी सुनावनीच घेतली नाही. दरम्यानच्या काळाज जिल्हाधिकार्‍यांनी या जागेवर निवडणूक लावण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागवले होते. त्यानुसार त्यांनी नगरसेवकांतून उर्वरित कालावधीसाठी नगराध्यक्ष निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यात राष्ट्रवादीचे उमेदवार शेख मंजूर यांचा एकमेव अर्ज शिल्लक आहे. त्यामुळे ते नगराध्यक्ष झाले याची केवळ प्रशासकीय घोषणा बाकी आहे. असे असले तरी सहाल चाऊस यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेऊन ही निवडणूक प्रक्रीया थांबविण्याची मागणी केली होती. मात्र हायकोर्टाने प्रक्रीया थांबविण्यास नकार देत नगर विकास विभागाकडे चाऊस यांच्या बडतर्फी संदर्भात असलेले अपिल दोन दिवसांची मुदत देत निकाली काढण्याचे आदेश दिले होते. आज हे दोन दिवस पूर्ण होत आहे. अपिलाचा निकाल विरोधात गेला तर चाऊस याही क्षणी खंडपीठात बसून असून तत्काळ राज्य शासनाच्या विरोधात याचिका दाखल करणार आहेत. आपल्याला कायद्याचा अन सत्तेचा दुरुपयोग करून बडतर्फ करण्यात आले असल्याचा आरोप याचिकेत केला जाणार आहे. त्यामुळे माजलगावच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीवर कायम टांगती तलवार असणार आहे.

चाऊस-सोळंके बैठकीत काय ठरले?

पाच दिवसापुर्वी सहाल चाऊस आणि आ.प्रकाश सोळंके यांची एक बैठक झाली. त्या बैठकीत चाऊस यांना सोळंके यांनी प्रस्ताव ठेवला. की जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमात चाऊस यांनी सहभाग नोंदवायचा नाही, स्वतःचा फॉर्म भरायचा नाही, अन् नगरसेवक फोडाफोडी करायचे नाहीत. त्याबदल्यात चाऊस यांनी कोर्टातून चाऊस यांच्या बाजुने निकाल आणला तरी त्या विरोधात सोळंके यांच्यावतीने कोणीही अपिल करायचे नाही. दोघात ठरलेल्या या अलिखीत कराराचा फायदा आता चाऊस यांना होतो की शेख मंजूर यांना हे पहावे लागेल.

Tagged