BEED-SUSIDE

शेतकर्‍याने पेट्रोल ओतून जाळून घेतले

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीडच्या लघू पाटबंधारे कार्यालयातील घटना

बीड : शेतजमीनीसंदर्भात तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने 49 वर्षीय शेतकर्‍याने लघू पाटबंधारे कार्यालयाच्या दारातच अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि.24) घडली.

  अर्जुन कुंडलिक साळुंके (वय 49 रा.पाली) असे त्या शेतकर्‍याचे नाव आहे. तालुक्यातील बिंदुसरा वसाहतीसाठी क्षेत्र कमी जास्त झाल्याबाबतच्या जमिनीविषयी एकत्रीकरणाच्या प्रक्रियेत अनियमितता झाल्याची तक्रार त्यांनी लघू पाटबंधारे कार्यालयाच्या संबंधित विभागाकडे केली होती. त्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचा आरोप करत शेतकर्‍याने आत्महत्येचा प्रयत्न केला. 90 टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, अर्जुन साळुंके यांच्याकडे 15 एक्कर शेती आहे. त्यापैकी काही जमीन विभागाकडे सिंचन क्षेत्रासाठी विभागाने घेतली आहे. हे मध्ये गेलेली आहे. सन 1962 सालचे प्रकरण असून यासंदर्भात सदरील शेतकरी भुमि अभिलेख व लघू पाटबंधारे विभागाकडे चकरा मारत होता. मात्र त्याला कोणीच दाद देत नव्हते. वारंवार अर्ज, विनंत्या करूनही दखल घेतली जात नसल्याने दि.26 ऑक्टोबर 2020 रोजी साळुंके यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. तरीही संबंधित विभागाने त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळेच त्यांनी आज टोकाचे पाउल उचलत लघू पाटबंधारेच्या कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. तेथील कर्मचार्‍यांनी तातडीने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत तो गंभीर भाजलेल्या अवस्थेत जमीनीवर कोसळला. त्याला तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक ठोंबरे, फेरोज पठाण, उजगरे, परजणे, रूग्णवाहिका चालक शेख ताहेर यांनी धाव घेतली.

दोषी अधिकार्‍यांनी कार्यवाही कधी? : कुलदीप करपे
आत्महत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी साळुंके यांच्यावर येथील शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे समजते. आता दोषी अधिकार्‍यांवरही प्रशासनाकडून गुन्हे दाखल करायला हवेत. यापूर्वी संबंधित शेतकर्‍याची आई उद्धव ठाकरे यांना भेटली होती. तेव्हापासून आजपर्यंत कसलीही कार्यवाही झाली नाही. तसेच, संबंधित शेतकर्‍यांने आमच्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडे मदत मागितली. आम्ही अधिकार्‍यांना वारंवार भेटलो, तेव्हा कुठे पत्रव्यवहार करण्यात आला. निगरगट्ट अधिकार्‍यांच्या निष्क्रियतेमुळे हा शेतकरी मरणाच्या दारात आहे. दोषी अधिकार्‍यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केली आहे.

दोषी अधिकार्‍यांवर गुन्हे नोंदवा : भाई मोहन गुंड
सदरील शेतकर्‍याने त्याच्या तक्रारीची दखल न घेतल्याने हे टोकाचे पाऊल उचलले. आता प्रशासनाकडून नियमावर बोट ठेवत शेतकर्‍यावरख आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होईल. अशीच तत्पतरता जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी दाखवून सदरील शेतकर्‍याच्या अर्ज प्रकरणात दफ्तरदिरंगाई केली अशा दोषी अधिकार्‍यांवर देखील तातडीने विभागांतर्गत कार्यवाही करून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शेकापचे राज्य मध्यवर्ती समिती सदस्य तथा शेतकरी नेते भाई मोहन गुंड यांनी केली आहे. दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांना भेटून निवेदन देणार असल्याचे गुंड यांनी सांगितले.

Tagged