‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेस लोकप्रतिनिधींकडून हरताळ

न्यूज ऑफ द डे बीड

डॉ.गणेश ढवळेंची मंत्री, आमदारांविरोधात तक्रार

बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेस लोकप्रतिनिधींकडूनच हरताळ फासण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. तीन मंत्र्यांसह तीन आमदारांविरोधात बीडचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे.

   तक्रारीत पुढे म्हटले की, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे बंधू अर्जून यांच्या नंदुरबार येथील विवाह समारंभाप्रसंगी आरोग्यमंत्र्यांसह तीन मंत्री, तीन आमदारांसह अनेक लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती. यावेळी सामाजिक अंतराचे पालन झाले नसून जबाबदार व्यक्तींनीच मास्क सुद्धा वापरलेले नाहीत. यात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य धनंजय मुंडे, आ.संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, सतीश चव्हाण यांच्यासह आजी-माजी आमदारांचा समावेश आहे. आरोग्य विभागाकडून कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे संकेत यापूर्वीच देण्यात आले आहेत. या लाटेचा सामना करण्यापूर्वी खबरदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. अशा परिस्थितीतहरी त्यांच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेस हरताळ फासणार्‍या लोकप्रतिनिधींकडून सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यामुळे शासकीय नियमानुसार दंड वसूल करण्यात यावा. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे या गोष्टींमुळे महाराष्ट्र शासनाची बदनामी होत आहे, याप्रकरणी संबंधित लोकप्रतिनिधींविरोधात कार्यवाही करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी केली आहे.

Tagged