आईविरोधात मुलानेच उभा केला बापाचा पॅनल

न्यूज ऑफ द डे मनोरंजन मराठवाडा राजकारण

ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी
औरंगाबाद : राजकारणात कधी काय होईल? हे कोणीही सांगू शकत नाही. अगदी तसाच प्रकार औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणात समोर आला आहे. आईविरोधात मुलानेच बापाचा पॅनल उभा केला आहे. ही राजकीय खेळी ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड मतदारसंघात पहायला मिळाली आहे.

वृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव पुण्यात अटकेत आहे. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत अकरावीत शिकत असलेले त्यांचा सुपुत्र आदित्य जाधव याने पत्रकार परिषद घेऊन वडील हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनलची घोषणा केल्याने राजकारणातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अदित्यनं थेट पत्रकार परिषद घेऊन वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली. हर्षवर्धन यांचे पॅनल हे त्यांची पत्नी व भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या विरोधात उभे करण्यात आले आहे, अशी घोषणा केल्यानंतर तालुक्यातील शेतकरी त्रस्त असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हर्षवर्धन जाधव पुन्हा राजकारणात सक्रिय होत असल्याचे यावेळी आदित्यनं पत्रकारांना सांगितले. एवढंच नाही तर ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगानं पत्रकारांनी विचारलेल्या खोचक प्रश्नांची अगदी कसलेल्या नेत्याप्रमाणे उत्तरंही दिली. यानिमित्ताने ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत आता माजी आमदार रायभान जाधव यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात अटक झाल्यानंतर आदित्यनं स्वतः सर्व सूत्रे हातात घेतली आहेत. यानिमित्तानं स्वतःचीही राजकीय वाटचाल सुरू केल्यानं राजकारणातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तालुक्यातील सर्व कार्यकर्ते सोबत असल्याचे सांगत तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी आदित्यनं स्पष्ट केलं आहे.

Tagged