प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांचा निर्णय
पैठण दि. 5 : मागील वर्षी सैलानी बाबा यात्रेवर बुलडाण जिल्हा प्रशासनाने बंदी घातल्यानंतर लगोलग पैठण येथील नाथषष्ठी यात्रेवरही बंदी घालण्यात आली होती. याहीवर्षी तोच कित्ता प्रशासनाने गिरवलेला आहे. प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी पैठण शहरात पायी दिंड्या आणण्यास निर्बंध घातले आहेत.
महाराष्ट्रातील संत परंपरेत सर्वात मोठी यात्रा म्हणून संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठीकडे पाहिल्या जाते. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा एप्रिल महिन्यात होणार्या नाथषष्ठी निमित्त पायी दिंड्यांना औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार नसल्याचा स्पष्ट इशारा शुक्रवारी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे यांनी दिला. त्यामुळे वारकर्यांनी वाहनांनी जाऊन दर्शन करण्याचे नियोजन केले आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून संत मंडळी पायी दिंड्या घेऊन पैठण येथे येतात व संत एकनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतात. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जवळपास एक महिना अगोदर पैठणकडे येण्यासाठी लगबग सुरू असते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने या यात्रा महोत्सवाला कोणीही पायी दिंडी घेऊन येण्यास प्रवेश बंद करण्याचा निर्णय कोरोना पार्श्वभूमीवर देण्यात आलेला आहे. असे असले तरीही महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायातील संत मंडळीने वाहनाने जावून दर्शनवारी करण्याचे ठरविले आह. या निर्णयाबाबत लवकरच वारकरी फडकरी समाज संघटनेचे अध्यक्ष व विठ्ठल रुक्माई मंदिर पंढरपूर येथील विश्वस्त जळगावकर महाराज यांनी सर्व पायी दिंडी सोहळा प्रमुखाची तातडीने बैठक बोलविली आहे. यात्रा दरम्यान मंदिरातील नित्य कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने सुरूच राहणार आहेत.
औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी या पारंपारिक उत्सवामध्ये पायी दिंडीद्वारे सहभाग घेतात. मानकर्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून कमीत कमी पायी दिंडी सोहळा यातील दहा ते पंधरा टाळकरी विणेकरी यांना पायी दिंडी घेऊन येण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी तातडीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वारकरी फडकरी समाज संघटनेचे राज्य अध्यक्ष तथा विठ्ठल रुक्माई मंदिर देवस्थान पंढरपूर येथील विश्वस्त ह.भ.प. जळगावकर महाराज यांनी ‘कार्यारंभ लाईव्ह’शी बोलताना दिली आहे.