beed lock down

चालाखी आज झाली उघड… सगळंच बंद; फक्त लॉकडाऊन ऐवजी निर्बंध!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

-सामान्य जनतेला जिल्हाधिकार्‍यांचा आदेश समजलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा…

जिल्हाधिकारी चिडीचूप : बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्या नव्या आदेशाने नागरिक संभ्रमात

बालाजी मारगुडे, शुभम खाडे / बीड

बीड जिल्हाधिकार्‍यांनी पुकारलेला लॉकडाऊन 4 एप्रिल रोजी संपला आणि 5 एप्रिल रोजी सर्व व्यापार्‍यांनी आपआपली अस्थापने सुरु ठेवली. आज पुन्हा जिल्हाधिकार्‍यांनी महाराष्ट्र शासनाचा कालचा इंग्रजीमधील आदेश मराठीत टाकून त्यात बीड जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत 15 एप्रिल रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामुळे जिल्हाभर संभ्रम आहे. जिल्हाधिकार्‍यांनी राज्य शासनाचाच आदेश पुढे करून जिल्ह्यात उद्यापासून फक्त अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व अस्थापना बंद राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे काल महाराष्ट्र शासनाने घातलेले निर्बंध हे चक्क लॉकडाऊन असल्याचेच आजच्या जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशातून दिसत आहे. या सगळ्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भ्रमनध्वनी घेण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे सामान्य जनतेला जिल्हाधिकार्‍यांचा आदेश समजलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा…

बीड जिल्ह्याशी संबंधीत कुठल्या
अत्यावश्यक सेवा सुरु राहणार?

वैद्यकीय आणि सर्वच आरोग्य सेवा, किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, दुध डेअरी, बेकरी, मिठाई खाद्य दुकाने, मालाची वाहतूक, शेती संबंधीत सेवा, ई-कॉमर्स, मान्यता प्राप्त वृत्तपत्रे व त्याच्याशी संबंधीत सेवा,

अत्यावश्यक सेवा किती ते
किती वाजेपर्यंत सुरु राहणार

अत्यावश्यक गणल्या गेलेल्या सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री आठपर्यंत सुरु राहतील. मात्र ह्या वेळा संभ्रमीत करणार्‍या आहेत. हा आदेश अत्यावश्यक सेवेसाठीच असेल तर रात्री 8 नंतर मेडिकल दुकानेही बंद ठेवायची का? असा प्रश्न निर्माण होतो. मुंबईत बसून काढलेले आदेशाचे आणि सामन्य जनतेचा त्या आदेशाशी काही संबंध आढळलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा असेच या आदेशातून वाटते.

शनिवार ते रविवार कडक लॉकडाऊनमध्ये काय बंद असणार?
महाराष्ट्र शासनाने एका आदेशात शुक्रवारी रात्री आठ ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र वरील आदेशात अत्यावश्यक सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरु राहतील असे सांगितले परत शनिवार ते रविवारच्या लॉकडाऊनमध्येही याच सेवा सुरु राहणार असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा कुठल्याच कालावधीत बंद नाहीत असे आदेशातून स्पष्टपणे जाणवते. मग अत्यावश्यक सेवेसाठीच्या वेळा दोनदा वेगवेगळ्या ठिकाणी का नमूद केल्या हा प्रश्नच उरतो.

जिल्ह्यात काय बंद असणार?
जिल्हाधिकार्‍यांनी आज दिलेल्या आदेशात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, बाजारपेठा, मॉल्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे, मनोरंजन पार्क, जलतरण तलाव, व्यायाम शाळा, क्रिडा संकुले, पूर्ण दिवस बंद राहतील. हॉटेलमधून केवळ पार्सल सुविधा सुरु राहील. तर शनिवार, रविवार या दोन दिवसात हॉटेलमध्ये जाऊन पार्सल घेता येणार नाही. केवळ फोनद्वारे पार्सल ऑर्डर करता येईल. शिवाय सर्व कामागारांच्या आरटीपीसीआर चाचण्या किंवा लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. 10 एप्रिलपासून त्याची तपासणी होणार आहे.

  • याशिवाय सर्व प्रकारची धार्मिक स्थळांमध्ये रोजची पुजा अर्चा करणार्‍यांशिवाय इतरांना प्रवेश बंद असेल. सर्व सलून, स्पा, ब्यूटीपार्लर बंद, शाळा व महाविद्यालये बंद (10 व 12 वीच्या विद्यार्थ्यांना सूट), खासगी क्लासेस बंद, सर्व प्रकारचे धार्मिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रम बंद असणार आहेत.
  • विवाह समारंभास 50 नागरिकांना अनुमती परंतु त्या सर्वांना अ‍ॅन्टीजेन किंवा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक त्यामुळे लग्न करण्याच्या कुणी भानगडीत पडणार नाही. अशा ठिकाणी सेवा देणारा व्यक्ती प्रमाणपत्राशिवाय आढळल्यास त्यास 10 हजार दंड.
  • रस्त्यावर भजे-चिवडा असे खाद्यपदार्थ त्याच ठिकाणी खाण्यास मनाई आहे. त्यांना फक्त घरपोहोच सेवा देता येणार. म्हणजे हेही व्यवसाय निर्बंधाच्या नावाखाली बंद.
  • बांधकाम क्षेत्रातील कामगारांना काम चालू असलेल्या ठिकाणीच मुक्कामी सोय असेल तरच बांधकाम करण्यास परवानगी असेल. त्यांनाही लसीकरण किंवा आरटीपीसीआर, अ‍ॅन्टीजेन टेस्ट केल्याचं प्रमाणपत्र 10 एप्रिलपासून अनिवार्य असेल.

प्रवासासाठी काय निर्बंध?
अ‍ॅटो रिक्षा ः अ‍ॅटो रिक्षासाठी केवळ चालक व फक्त 2 प्रवासी.
टॅक्सी (चारचाकी) ः चालक, वाहनाच्या प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के आरटीओ विभागाकडील नियमानुसार
बस ः फक्त बसून प्रवास करता येणार, उभ्याने प्रवास करता येणार नाही.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील चालक, वाहक व इतरांनी कोरोना निगेटिव्हचे अथवा लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र जवळ ठेवणे बंधनकारक असेल. 10 एप्रिलपासून असे प्रमाणपत्र तपासण्यात येईल. अन्यथा 1 हजार रूपये दंड आकारण्यात येईल.

कुठली कार्यालये सुरु?
सहकारी, सार्वजनिक व खाजगी बँका, विद्यूत पुरवठा, टेलिकॉम कंपन्या, विमा व मेडिक्लेम कार्यालये, औषध निर्मिती करणारे उद्योग, त्याच्या वितरणाशी संबंधीत वाहतूक

टिप- जिल्हाधिकार्‍यांचा खालील आदेश वाचून आमच्या कुवतीप्रमाणे आम्ही त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. यातील चूक भूलची सर्व जबाबदारी जिल्हाधिकारी बीड यांची असेल. यात असलेल्या काही चुका, संशयास्पद मजकूरासाठी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला मात्र त्यांनी भ्रमणध्वनीला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे आदेशातील सुस्पष्टता आम्हाला देता आलेली नाही. सामान्य जनतेला जिल्हाधिकार्‍यांचा आदेश समजलाच तर त्यांनी तो आमच्याशी शेअर केल्यास त्याचे स्वागतच असेल. आमच्या बातमीत आम्ही केवळ बीड जिल्ह्याशी संबंधीत बाबींचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे समुद्र, रेल्वे, चौपाटी असल्या उल्लेखांना आम्ही बातमीत स्थान दिलेले नाही.

1
2
3
4
6
7

8

Tagged