केज दि.26 : तालुक्यातील साळेगाव येथे एका महिलेचा राज्य रस्त्यावर मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी दि.25 रोजी समोर आली होती. प्रथमदर्शनी खून कोणी केला? हे स्पष्ट झाले नव्हते. मात्र अवघ्या काही तासातच सदरील घटनेचा उलगडा झाला. जावयानेच बायकोला नांदायला का पाठवत नाही म्हणून एका साथीदारासह सासूचा खून केल्याचे कारण समोर आले. या प्रकरणी पोलीसांनी आरोपी जावायाच्या मित्रास ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यास तीन दिवसाची कोठडी सुनावली आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील घायगुडा पिंपळा येथील लोचना उर्फ सुलोचना माणिक धायगुडे (वय 35) व त्यांचा पुतण्या अंकुश दिलीप धायगुडे हे मुलीला भेटण्यासाठी साळेगाव येथे गेले होते. जावाई अमोल वैजनाथ इंगळे हा मुलीसोबत नेहमी वाद करत होता. सुलोचना व जावाई अमोल यांच्यातही तिथे वाद झाला. त्यानंतर तिथून दुचाकीवर अंबाजोगाईला जात असताना जावायाने प्रशांत बबन इंगळे या मित्राच्या मदतीने साळेगाव परिसरात त्यांची दुचाकी अडवून डोळ्यात मिरची पुड टाकून धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये सुलोचना यांचा जागीच मृत्यू झाला तर अंकुश हा जखमी झाला. सदरील घटनेची माहिती मिळताच केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत, एपीआय संतोष मिसळे, कर्मचारी अशोक नामदास, कादरी, अमोल गायकवाड, मंगेश भोले, दिलीप गित्ते यांनी धाव घेतली. जखमी अंकुश यास रुग्णालया दाखल केले. या प्रकरणी पोलीसांनी प्रशांत इंगळे यास ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी अमोल इंगळे हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान प्रशांत इंगळे यास न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सपोनि.संतोष मिसळे हे करत आहेत.