बीड जिल्हा रुग्णालयातील घटना
बीड : येथील जिल्हा रुग्णालयात लसीकरण मोठी गर्दी झाल्याने नियंत्रित करण्यासाठी गेलेल्या पोलीस उपअधिक्षकांसह कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याची घटना जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज (दि.५) सकाळी १० वाजता घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जिल्हा रुग्णालयात लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. याठिकाणी पोलीस बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस हवालदार अनुराधा गव्हाणे यांनी ही माहिती वरिष्ठांना कळविली. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके हे कर्मचाऱ्यांसोबत केंद्रावर दाखल झाले. यावेळी गर्दीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न वाळके यांनी केला. यावेळी उपस्थितांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी देखील लाठीचार्ज केला. यादरम्यान स्वतः पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके, त्यांचे अंगरक्षक, होमगार्ड, दंगल नियंत्रण पथकाचे कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी महिला पोलीस हवालदार अनुराधा गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सहा जण ताब्यात घेतले आहेत.