आरणवाडी साठवण तलावाचा सांडवा फोडल्या प्रकरणी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

धारूर न्यूज ऑफ द डे

१५ ऑगस्टपर्यंत दोषींवर गुन्हे दाखल करा; अन्यथा जलसमाधी

धारूर : तालुक्यातील आरणवाडी साठवण तलावाचा प्रश्न आता पेटला आहे. या तलावातून गेलेल्या ५०० मीटर निकृष्ट रस्त्याचे पाप झाकण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विरोध झुगारून संगनमताने सांडवा फोडला. याप्रकरणी संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.२) सकाळी १० वाजल्यापासून खामगाव -पंढपूर मार्गावर आरणवाडी तालावशेजारी तब्बल दोन तास रास्ता रोको केला. १५ ऑगस्टपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल न केल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन जलसमाधी आंदोलन करू, असा इशारा भाजप नेते रमेश आडसकर यांनी दिला आहे.

आरणवाडी तलावाचा सांडवा फोडण्यास परिसरातील पाच-सहा गावातील शेतकऱ्यांचा विरोध असताना पोलीस बळाचा वापर करून सांडवा फोडण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. नियमबाह्य पद्धतीने सांडवा फोडणाऱ्या दोषी सर्व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. तसेच, सांडवा पूर्ववत करण्यात यावा, यासाठी ५०० हून अधिक शेतकऱ्यांनी एकत्र येत रास्ता रोको केला. या आंदोलनास भाजप, शिवसेना, काँग्रेस, शेकापसह इतर राजकीय, सामाजिक पक्ष संघटनांनी सक्रीय पाठिंबा दिला. यावेळी तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी निवेदन स्वीकारले.

तहसीलदार, पोलिसांची धावपळ!
आंदोलन होणार हे माहिती असूनही तहसीलदार यांनी जलसंधारण विभाग, एम.एस.आर.डी.ला पत्रव्यवहार करून अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या नाहीत. दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी पाठ फिरवली. दरम्यान, याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगीत केले. यावेळी तहसीलदार, पोलिसांची धावपळ झाली.

Tagged