विद्यार्थीनींच्या रॅगिंगला कंटाळून बीडच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

नाशिक दि.18 : नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये एम.डी.गायनिकच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणार्‍या आणि वरिष्ठ विद्यार्थिनींच्या त्रासाला कंटाळलेल्या बीड येथील एका विद्यार्थ्याचा मृतदेह ऑपरेशन थेटरच्या बाथरूममध्ये सापडला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्याच्या वहीमध्ये एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यात आपण रॅगिंगला कंटाळलो असल्याचा उल्लेख केला आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेकअरा वाजता घडली आहे. नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. मृत्युस कारणीभूत असणार्‍या विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे.
बीड येथील श्रीरामनगर येथे राहणारा स्वप्नील महारूद्र शिंदे (वय 26) हा नाशिक येथील डॉ.वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये एम.डी.गायनिकच्या द्वितीय वर्षामध्ये शिक्षण घेत आहे. मंगळवारी (दि.17) रात्री साडेअकरा वाजता डॉ.वसंतराव पवार मेडिकल कॉलेजच्या ऑपरेशन थेटरमधील बाथरूममध्ये त्याचा मृतदेह सापडला. स्वप्नील शिंदे याने वरिष्ठ विद्यार्थिनीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे, असा आरोप स्वप्निलच्या नातेवाईकांनी केला आहे. स्वप्नीलच्या वहीमध्ये एक सुसाईड नोट सापडली आहे. इंग्रजी भाषेत लिहिलेल्या या सुसाईड नोटमध्ये आपल्यावर रॅगिंग केली जात असल्याचा उल्लेख आहे. यात दोन विद्यार्थिनीच्या नावाचाही उल्लेख आहे. ज्या विद्यार्थिनीचा उल्लेख आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. बुधवारी सकाळी स्वप्नीलचे शवविच्छेदन करण्यात आले. नातेवाईकांनी अद्यापपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला नाही. या संदर्भात रितसर तक्रारही देण्यात आली. मात्र तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. आमच्यावर अन्याय केला जात आहे, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

Tagged