वाळुची कारवाई हिरोगिरी ठरू नये

गेवराई न्यूज ऑफ द डे

जिल्हाधिकारी, एस.पी. रात्रभर होते नदीपात्रात

बीड : दोन दिवसांपुर्वी नुतन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा आणि पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी गेवराई तालुक्यातील गोदापात्रात अचानक छापे मारत केलेल्या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे. मात्र ही कारवाई केवळ हिरोगिरी किंवा हप्ता वसुलीची वर्दी ठरू नये, अशी अपेक्षा सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे. कारण पुर्वी ज्या काही कारवाया प्रशासनाकडून झाल्या त्या केवळ हप्ता वसुलीसाठी होत्या, हाच प्रत्यय यापुर्वीच्या कारवाईमधील अधिकार्‍यांनी आपल्या कृतीतून दिलेला होता.

शासनाला रितसर टेंडर भरून वाळुचा धंदा करायचा म्हटलं की टेंडरधारकांच्या अंगावरच काटा उभा राहतो. कारण एकतर वाळू उपसायचे कोट्यावधी रुपये भरा, आणि वरतून कोतवालापासून ते महसुलच्या उपविभागीय अधिकार्‍यांपर्यंत, गावच्या पोलीस पाटलापासून ते उप विभागीय पोलीस अधिकार्‍यांपर्यंत सगळ्यांना हप्ते देऊन ‘जी सर जी सर’ करत बसा. वरतून न चुकता दक्षीणा ठेवा, एवढं होऊनही पुन्हा रस्त्यावर कुणाही आलतू फालतुने गाडी अडवायची अन् वर थोबाड करून विचारायचं रॉयल्टीची पावती आहे का? त्याचं समाधान करीत नाही तोच संबंध नसलेल्या कॉन्स्टेबलने देखील गाडीला हात दाखवायचा. पुन्हा त्याचीही मगदमारी करा. इतकं सगळं दिव्य पार केल्यानंतरही पेपरवाल्यांनी वाळू चोर म्हणूनच नाव लावायचं, इतकं खालच्या दर्जाचं जिणं रितसर टेंडर घेणार्‍यांचं झालं आहे. त्यामुळे सगळे वाळू व्यवसासिक चोरून वाळू विक्रीला प्राधान्य देत आहेत. रितसर वाळू उपसावी आणि शासनाच्या तिजोरीत महसूल यावा असा एकही नियम शासनाने टेंडर धारकांच्या बाजुने केलेला नाही.
आता काल -परवा जी वरिष्ठ अधिकार्‍यांनी गोदापात्रात उतरून कारवाई केली त्या कारवाईचा दरारा शेवटपर्यंत रहायला हवा. अन्यथा इतर अधिकार्‍यांच्या कारवाई प्रमाणे याही कारवाईकडे जनतेला पहावं लागेल. ‘नव्या नवरीचे नऊ दिवस’ झाले की आम्हालाही त्याची सवय होऊन जायला नको याची दक्षता अधिकारी वर्गानेच घ्यायला हवी. भारतीय राज्यघटनेने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक या खुर्चीला एक दर्जा बहाल केला आहे. या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीने आपली पॉवर गोरगरीबांच्या कल्याणासाठीच वापरायला हवी, असे घटनाकारांचे मत होते. दुर्दैवाने अशी मतं आता आम्हाला केवळ पुस्तकात वाचायला मिळतात. प्रत्यक्षात या खुर्चीवर बसलेली व्यक्ती कुठल्यातरी पुढार्‍यांच्या हातचं बाहुलं बनून काम करते तेव्हा ह्यासाठी असं शिक्षण घेतलं होतं का असा प्रश्न विचारायचं धाडस सामान्य माणसात देखील आपोआप येऊन जातं. सामान्य माणसांना असे प्रश्नच पडायला नकोत इतकं चांगलं काम या पदावरील व्यक्तींकडून अपेक्षीत आहे. जिल्ह्याला लाभलेले नवीन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याकडून आता याच कामाची अपेक्षा जनता व्यक्त करीत आहे. नुसती कारवाई करून हिरो होण्यापेक्षा या कारवाईमुळे जनतेला किती फायदा झाला? की फायदा होण्यापेक्षा तोटाच झाला? कारण अनेकदा कारवाई चालू झाल्या की 30 हजार रुपयांना मिळणारा हायवा 60 हजार रुपयांना विकला जातो, फक्त हे व्हायला नको, एवढीच सामान्य जनतेची अपेक्षा आहे.

Tagged