दिंद्रुड पोलीसांची गुंडगिरी; फिर्यादीलाच बेदम मारहाण

बीड

शिवसेना जिल्हाप्रमुखांनी जाब विचारला

दिंद्रूड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड पोलीसांना नेमकी कशाची गुर्मी चढली हे कळायला मार्ग नाही. त्यांनी फिर्याद दाखल करणसाठी आलेल्या फिर्यादीलाच सुंदरीने बेदम मारहाण करून कायदा हातात घेण्याचा प्रकार केला आहे. पोलीसांच्या या गुंडगिरीमुळे संताप व्यक्त होत आहे. दरम्यान हा प्रकार समजताच शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी ठाण्यात धाव घेत पोलिसांना जाब विचारला. यावेळी पोलीस अधिकारी निरूत्तर होते.

बाबुराव रामभाऊ वाघचौरे (वय 35) व गोविंद रामभाऊ वाघचौरे (रा.भोपा ता.धारुर) हे दोघे भाऊ 25 ऑगस्ट रोजी दिंद्रुड ठाण्यात 9 वाजेच्या सुमारास भांडणाची तक्रार देण्यासाठी गेले होते. येथील पोलीस कर्मचारी विष्णु घोळवे आणि सुरेवाड यांनी तक्रारदारांना कशाला आले विचारत, मधल्या रुममध्ये व्हा असे सांगून तक्रार घेण्या अगोदरच सीसीटीव्ही नसलेल्या रूममध्ये बोलावून सुंदरीने बेदम मारहाण केली. पोलीसांची ही गुंडगिरीच झाली असून तक्रार द्यायला ठाण्यात यायचं की नाही? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. या दोघाही तक्रारदाराने या संबंधी दिंद्रुड ठाण्यात तक्रार नोंद केली असून वरीष्ठ पोलीस अधिकारी काय कारवाई करतात हे पहावे लागेल.

मस्तवाल पोलिसांना निलंबित करा : आप्पासाहेब जाधव
लोकांना त्रास झाल्यास ते पोलीस ठाण्यात न्यायाच्या अपेक्षेने येतात. याउलट येथील पोलिस कर्मचार्‍यांनी दादागिरी करत आलेल्या फिर्यादीला फिर्याद घेण्या अगोदरच एका रूम मध्ये बोलावून सुंदरीने बेदम मारहाण केली आहे. तक्रारदारांना बेदम मारहाण करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना वरिष्ठांनी तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कडक शासन करावे. मी स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे दिंद्रुड पोलिसांची तक्रार दाखल करणार आहे, असे शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी म्हटले आहे.

Tagged