बंगालीपिंपळा, शेकटा पाझर तलाव फुटले; खोपटी तांडा तलावाला भगदाड

गेवराई न्यूज ऑफ द डे बीड

गेवराई तालुक्यात पावसाचा हाहाकार

गेवराई : तालुक्यातील शनिवारी रात्री पावसाचे रौद्ररूप पहायला मिळाले. पावसाने हाहाकार करत जनजीवन विस्कळीत केले आहे. दरम्यान तालुक्यात रात्रीतून बंगालीपिंपळा व शेकटा येथील पाझर तलाव फुटल्याने तलावाखालील जमीनीचे व शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर गेवराईजवळील खोपटी तांडा येथील तलावाच्या भिंतीला मोठे भगदाड पडले आहे. याठिकाणी भिंतीतून पाण्याचा मोठा विसर्ग होत आहे. तर तालुक्यांतील दोन – तीन तलावाच्या भिंतीला देखील तडे गेले असून हे तलाव फुटण्याची भिती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. तरी प्रशासनाने वेळीच लक्ष दिल्यास याठिकाणी होणारे नुकसान टळू शकते.

तालुक्यात रात्री सर्वदूर अतिवृष्टी झाली. परिणामी नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत, तर छोटे-मोठे तलाव ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. यामध्ये तालुक्यातील बंगालीपिंपळा व शेकटा येथील पाझर तलाव फुटल्याने शेकडो हेक्टर जमीनीचे नुकसान झाले असून पिके पाण्यात वाहून गेले आहेत. तर आज सकाळी खोपटी तांडा येथील तलावाला देखील मोठे भगदाड पडले आहे. तसेच गाडेवाडी येथील पाझर तलाव क्र. 2 व धुमेगाव गावाजवळील पाझर तलाव फुटण्याची शक्यता आहे. येथील रात्रीपासून ओसंडून वाहत असून सध्या तलावाच्या भिंतीला तडे गेले आहेत. सध्या तलावात येणाऱ्या पाण्याची आवक जास्त असून तडे गेलेल्या ठिकाणी तलाव फुटण्याची भिती ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. हे तलाव फुटल्यास बंगालीपिंपळा व शेकटा येथे जसे शेती व पिकांचे नुकसान झाले, त्याचप्रमाणे गाडेवाडी व धुमेगाव याठिकाणी देखील मोठे नुकसान होऊ शकते, त्यामुळे प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Tagged