बीड दि.3 : पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने केज तालुक्यात धाड टाकत 17 लाख 46 हजारांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.2) रात्री करण्यात आली. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पप्पू कदम (रा.क्रांतीनगर ता.केज) असे आरोपीचे नाव आहे. त्याने येथीलच वसंत महाविद्यालयाच्या उत्तरेस शेवाळे यांच्या घराच्या बाजूच्या गोडाऊनमध्ये गुटख्याचा साठा केला होता. याची माहिती विशेष पथकास मिळाली. गुरुवारी रात्री या गोडावूनवर छापा टाकला असता, यावेळी 17 लाख 46 हजार 220 रुपये किमतीचा गुटखा मिळून आला. याप्रकरणी पप्पू कदम विरोधात प्रतिबंधित गुटखा साठा करताना व विक्री करताना आढळून आला म्हणून त्याच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात भादवि 272, 273, 328 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर.राजा, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे व त्यांच्या टीमने केली. या कारवाईने गुटखा माफियामध्ये एकच खळबळ उडाली आहे.