पोलीसांचा तगडा बंदोबस्त
बीड दि.5 : परळी शहरातील वैजीनाथ मंदिर परिसरामध्ये करुणा धनंजय मुंडे या रविवारी (दि.5) दुपारच्या सुमारास दाखल झाल्या आहेत. त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही वेळातच त्या पत्रकारांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी फेसबुक पोस्टवर म्हटले होते. पत्रकार परिषदेत त्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नुकतेच काल आपल्या फेसबुक पोस्टमध्ये करुणा मुंडे यांनी म्हटले होते की, बीडमधील जनतेचा आशीर्वाद आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद करून समस्या जाणून घेणार आहे. तसेच अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पाहणी करून गावकरी संवाद साधणार आहे. तसेच परळी वैजनाथ येथील लोकांसमोर काही गोष्टींचा खुलासा सुध्दा करणार आहे. या लाईव्ह दरम्यान माझ्यावर, आईवर, बहिणीवर, मुलांवर झालेल्या अत्याचाराबद्दल तसेच मुलांना कशाप्रकारे धमकीचे फोन येत आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे. याबाबत देखील त्या रविवारी पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टींचा खुलासा करणार आहेत.
दरम्यान करुणा मुंडे यांच्या परळी दौर्याने ना.धनंजय मुंडे यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. अनेक धनंजय मुंडे समर्थक महिलांनी मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयाबाहेर गर्दी केली आहे. तर करुणा मुंडे यांच्या पत्रकार परिषदेत होणार्या काही धक्कादायक खुलाशाना प्रकाशित करण्यास किंवा लाईव्ह करण्यास निर्बंध घालण्यात आल्याचे धनंजय मुंडे यांचे वकील सुषमा सिंग यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे नेमके काय आणि कसे वार्तांकन होणार यावरही प्रश्न चिन्ह आहे.