aaranwadi, aranwadi talav

बहुचर्चित आरणवाडी साठवण तलाव खचण्यास सुरुवात?

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

तलाव फुटण्याच्या भीतीने परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण

सचिन थोरात । धारूर
दि. 6 : शहरापासून अवघ्या चार किमी अंतरावर घाटात असणारा आरणवाडी साठवण तलाव मागील दोन महिन्यापासून सतत या ना त्या कारणाने चर्चेत आहे. दोन दिवसापासून झालेल्या संततधार पावसाने सांडव्यावरून वेगाने पाणी पडत आहे. परंतु सदरील तलावाच्या पिचिंग असलेल्या भिंतीजवळ पाणी सोडण्यासाठी करण्यात आलेल्या विहिरीचा भाग रात्री खचला असल्याने परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल आहे. सदरील तलाव फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


मागील दोन महिन्यापासून सांडवा फोडल्याप्रकरणी आरणवाडी साठवण तलाव चर्चेत आला होता सदरील सांडवा फोडल्यानंतर परिसरातील शेतकर्‍यांनी आक्रमक आंदोलन करत नियमबाह्य फोडलेला सांडवा पूर्ववत करण्यास प्रशासनास भाग पाडले होते.सांडवा पुर्ववत झाल्याने परिसरातील गावांमध्ये मोठी हरितक्रांती होणार असल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच मागील दोन दिवसापासून तालुक्यात पडत असलेल्या संततधार पावसाने तलावाच्या सांडव्यावरून पाणी वेगाने वाहत आहे. परंतु मध्यरात्री पिचिंग असलेल्या भिंतीचा विहिरीजवळील काही भाग खचल्याने तलाव फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिसरातील चोरांबा, पहाडी पारगाव, थेटे गव्हाण इत्यादी गावांमध्ये सांडवा फुटण्याच्या चर्चेने भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे.

सदरील तलावाच्या भिंतीचा काही भाग खचला असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही त्या ठिकाणी तात्काळ पाहणी करणार आहोत. पाहणी केल्यानंतर सदरील ठिकाणची नेमकी परिस्थिती काय आहे ते सांगता येईल.

विशाल हात्ते
उप अभियंता जलसंधारण विभाग.

Tagged