परळी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गांजाची शेती!

बीड


दोन आरोपी ताब्यात
बीड दि.29 : परळी तालुक्यातील हाळंब येथील परिसरात विविध ठिकाणी शेतात गांजाची लागवड केलेली शुक्रवारी (दि.29) पहाटे आढळून आली आहे. परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे व त्यांची टीमने कारवाई केली असून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चक्क पालकमंत्र्यांच्या तालुक्यात गांजाची शेती आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
परळी तालुक्यातील हाळंब परिसरात शेतात गांजाची लागवड केली असल्याची माहिती परळी ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांना मिळाली. त्यांनी सरकारी पंचासह हाळंब येथे पाहणी केली. यावेळी या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केलेली आढळून आली. मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्याची कारवाई सुरू असून घटनास्थळी वरीष्ठही दाखल झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे.