खासदार, आमदारांचं जिल्हाधिकारी यांचे कोनशीलेवर नावच नाही

अंबाजोगाई बीड मराठवाडा

बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचं उद्घाटन झाले. उद्घाटनाच्या कोनशीलेवर जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे आणि भाजपच्या आमदारांना जाणीवपुर्वक डावलण्यात आले आहे. इतकंच नव्हे तर उद्घाटनाला उपस्थित असणार्‍या आयएएस जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना देखील स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे स्वारातिच्या या कृतीविषयी चर्चेला उधान आले आहे.

शासकीय निधीतून जिल्ह्यासाठी ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. मात्र पालकमंत्री धनंजय मुंडे किंवा अधिष्ठाता देशमुख यांच्या घरचा कार्यक्रम असावा, घरच्या पैशातून ही लॅब उभारली असावी, अशाप्रकारे विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना डावलण्यात आले आहे.
अशा प्रकारचे राजकारण होऊ नये म्हणून शासनाने 2015 साली एक अध्यादेश काढलेला होता. त्यात स्पष्टपणे म्हटले होते की, शासकीय निधीतून उभारण्यात आलेल्या एखाद्या प्रकल्पाच्या कोनशीलेवर स्थानिकचे विधानसभा सदस्य, स्थानिकचे विधान परिषद सदस्य, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य यांना निमंत्रीत करण्यात यावं. त्यांचं निमंत्रण पत्रिकेत नाव सामाविष्ट करण्यापासून ते त्यांच्या बसण्याच्या जागेपर्यंतची सर्व व्यवस्था राजशिष्टाचारानुसार करावी. त्यांचा सन्मान करावा. आणि हे करण्याची सर्व जबाबदारी कार्यक्रमाच्या आयोजकांवर संबंधीत विभागप्रमुखांवर राहील, असे न झाल्यास संबंधीत विभागप्रमुखांना कारवाईस सामोरे जावे लागू शकते.

याबाबत स्वारातीचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. तर जिल्हाधिकारी यांनी व्हॉटसअप मेसेजला अद्याप रिप्लाय दिलेला नाही.

यांची नाहीत नावे
खा.डॉ.प्रीतमताई मुंडे, आ.सुरेश धस, आ.विनायक मेटे, आ.लक्ष्मण पवार हे जिल्ह्यातून निवडून गेलेले व विधान परिषदेवर निवड झालेले सदस्य आहेत. शासकीय नियमानुसार यांची नावे कोनशिलेवर असायलाच हवी होती. शिवाय जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी हे तर कोरोना लढ्यातील प्रमुख योध्दे आहेत. त्यांनाही या कोनशीलेवर स्थान नाही. जेव्हा संशयितांचे स्वॅब घेतले जायचे तेव्हा पुण्यापर्यंत स्वॅब नेऊन यांनी तपासून आणले आणि आता स्वतःच्या जिल्ह्यात लॅब होत असताना यांची नावेच नाहीत काय म्हणावं याला? अतिशय चुकीचा प्रकार स्वाराति प्रशासनाने केलेला आहे.

खासदार स्वारातीच्या अभ्यागत मंडळाच्या अध्यक्ष
खा.डॉ.प्रितमताई मुंडे या स्वारातीच्या अभ्यागत मंडळाच्या अध्यक्ष आहेत. त्यांचंही नाव कोनशीलेवर नाही. किंवा त्यांना साधं निमंत्रण देखील नाही. खासदार यावर काय भुमिका घेतात? की नेहमीप्रमाणे गुपचूप बसतात हे आज दिवसभरात दिसून येईल.

पालकमंत्र्यांचं गलिच्छ राजकारण – आ. नमिता मुंदडा
पालकमंत्री स्वारातिच्या स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून गलिच्छ राजकारण करीत आहेत. स्थानिकच्या लोकप्रतिनिधींना सन्मानपुर्वक वागणूक द्यायला हवी. ज्यावेळी स्व.विमलताई मुंदडा, जयदत्त अण्णा क्षीरसागर, पंकजाताई मुंडे या जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या तेव्हा कोनशीलेवर, निमंत्रण पत्रिकेवर विरोधकांची देखील नावे होती. यानिमित्ताने पालकमंत्री चुकीचा पायंडा पाडत आहेत. आम्ही याचा निषेध करतो. अधिकार्‍यांवर नियमानुसार कारवाई करण्यासाठी आम्ही आवाज उठविणार आहोत, असे केज विधानसभा मतदारसंघाच्या आ.नमिता मुंदडा यांनी कार्यारंभशी बोलताना सांगितले.

पदाचं अवमुल्यन -अ‍ॅड. अजित देशमुख
अनेक कोनशीलेवर जिल्हाधिकार्‍याचं नाव असतं. मात्र या कोनशीलेवर जिल्हाधिकारी उपस्थित असताना त्यांचं नाव नाही. राजकारण्याकडून जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख या पदाचं अवमुल्यन केलं आहे. वास्तविक जिल्हाधिकार्‍यांच्या सहीशिवाय ही प्रयोगशाळाच अस्तित्वात येऊ शकत नव्हती. अधिष्ठातांचं नाव असेल तर जिल्हाधिकार्‍यांचं का नाही? दोषी अधिकार्‍यावर कारवाई व्हायलाच पाहीजे अशी मागणी जनआंदोलनाचे विश्वस्त अ‍ॅड.अजित एम.देशमुख यांनी केली आहे.

सोशल डिस्टंन्सिंगची एैसीतैशी – अक्षय मुंदडा
शासन एकीकडे गर्दी करू नका, कार्यक्रम घेऊ नका म्हणत आहे. आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उद्घाटनाचे कार्यक्रम घेतात. सोशल डिस्टंन्सिंगचा तर पार फज्जा उडवून टाकला आहे. शासकीय कार्यक्रमात असे होत असेल तर सामान्य लोकांनी यांच्याकडून काय आदर्श घ्यावा, अशी टिका भाजपचे युवानेते अक्षय मुंदडा यांनी केली आहे.

Tagged