कोरोना टास्क फोर्सची बैठक
मुंबई : राज्यातील शहरी भागात 8 ते 12 वी आणि ग्रामीण भागात पाचवी ते 12 वीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यानंतर आता राज्यात पहिलीपासूनच्या शाळा सुरू होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. यासंदर्भात आता मोठी बातमी समोर आली आहे.
कोरोना टास्क फोर्सकडून राज्यातील पहिली ते पाचवी शाळा सुरु करण्याबाबत एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. टास्क फोर्सचे प्रमुख डॉ.संजय ओक यांनी याबद्दलचा खुलासा केला आहे. राज्याचा शालेय शिक्षण विभाग जरी पहिली ते पाचव्या वर्गांपर्यंतच्या शाळा सुरु करण्याबाबत अनुकूल असेल तरी या वर्गांच्या शाळा सुरु करण्याची ही योग्य वेळ नाही. पहिली ते पाचवीच्या शाळा सुरु करण्यास टास्क फोर्स अनुकूल नाही. तसंच विद्यार्थ्यांचं संपूर्ण लसीकरण झाल्याशिवाय शाळा सुरू करण योग्य होणार नाही असं मत टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केलं आहे.
लोकांच्या चुकीमुळे येऊ शकते तिसरी लाट
मास्क ही पहिली लस आहे, पण सणात लोकांनी मास्क टाळला, यामुळेच तिसरी लाट येणारच नाही असं म्हणता येणार नाही. अमेरिकेत मुलांचं बाधित होण्याचं प्रमाण इतकं वाढले की मुलांना एका राज्यातून दुसर्या राज्यात शिफ्ट केले जात आहे, ही परिस्थिती मला माझ्या राज्यात येऊ द्यायची नाही. तिसर्या लाटेचा अंदाज चुकल्याचा आनंद मला आहे मात्र तिसरी लाट येणारच नाही असा म्हणता येणार नाही असंही डॉ. ओक म्हणाले. दरम्यान, केंद्र सरकारनं लहान मुलांचं लसीकरण सुरु करावं अशी मागणी डॉ.ओक यांनी केली आहे.