dhananjay munde

एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह; अखेर ‘तो’ मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

ना.धनंजय मुंडेंच्या फोनने यंत्रणा हालली

बीड : ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ या डायलॉगची अनुभुती आज राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व त्यांच्या टीमबाबत आली. त्यांच्या एका फोनने राज्यातील व परराज्यातील यंत्रणा हालली अन् दोन दिवसांपासून शवविच्छेदनाअभावी परराज्यात पडून असलेला एका ऊसतोड कामगाराचा मृतदेह अखेर आज (दि.13) नातेवाईकांच्या ताब्यात मिळाला.

  यशवंत सुभाष सोनकांबळे (वय 32, रा.लोणगाव ता.माजलगाव) असे मयत ऊसतोड कामगाराचे नाव आहे. त्यांचा व गावातील एका मुकादमाशी ऊसाच्या फडात वाद झाला. यात यशवंत सोनकांबळे यांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी लोकापूर (ता.मुधूळ, जि.बागलकोट, राज्य कर्नाटक) येथे घडली. या घटनेनंतर स्थानिक रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. अद्याप दोन दिवस झाले तरी शवविच्छेदन करण्यात आले नव्हते. मृत व्यक्तीचे नातेवाईक रडत होते. मदतीसाठी आक्रोश करीत होते. त्यांना तेथील स्थानिक प्रशासन मदत करीत नव्हते. हा प्रकार ऊसतोड कामगारांनी ‘कार्यारंभ’ला कळविला. याबाबतची माहिती ऊसतोड कामगार महामंडळाचे अध्यक्ष ना.धनंजय मुंडे व त्यांच्या टीमला कळविल्यानंतर तातडीने यंत्रणा हालली. आणि संबंधितांना मदत झाली.

प्रवास खर्चासाठी केली आर्थिक मदत
बीडचे पोलीस अधिक्षक ए.राजा यांनी बागलकोटच्या अधिक्षकांना मदत करण्याबाबत विनंती केली. त्यानंतर पोलिसांच्या माध्यमातून आरोग्य अधिकारी श्री.मुडूगल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने वैद्यकीय अधिकार्‍यांना पाठवून शवविच्छेदनाची प्रक्रीया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. परंतु, सरकारी व खाजगी रूग्णवाहिकेची व्यवस्था होत नव्हती. याशिवाय, नातेवाईकांकडे पैसेही नव्हते. त्यामुळे मृतदेह आणण्यासाठी तातडीने ना.धनंजय मुंडे यांनी प्रवास खर्च म्हणून 20 हजार रूपयांची मदत केली, त्यामुळे खाजगी वाहनाने मृतदेह आणता आला. याबद्दल मयताच्या नातेवाईकांसह ऊसतोड कामगारांनी धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

आम्हाला न्याय द्या, आरोपीला शासन करा
मुकादमाच्या मारहणीमुळे यशवंत सोनकांबळे यांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. मारहाण करणार्‍या आरोपीला मुधूळ पोलिसांनी जेरबंद केल्याचे सांगण्यात आले. आरोपीला कठोर शासन करावे अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी पालकमंत्री धनंजय मुंडेंकडे केली आहे.

Tagged