खंडणी मागत व्यवसायिकासह कामगारास बेदम मारहाण

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे

अंबाजोगाईतील घटना; पाच जणांवर गुन्हा

बीड : १० हजार रुपयांची खंडणी न दिल्याने व्यवसायिकासह कामगाराला पाच जणांनी गजासह वायरने बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना अंबाजोगाई शहरातील तथागत चौकाजवळ शुक्रवारी दुपारी पावणे दोन वाजता घडली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलीप श्रीकृष्ण डापकर (रा.हनुमान मळा) असे फिर्यादीचे नाव आहे. दुकानी आलेले साहित्य वाहनातून उतरून घेत असताना दुपारच्या सुमारास बाळू दळवे (रा.भाट गल्ली, अंबाजोगाई) हा आला आणि १० हजार रुपये दे म्हणाला. कशाचे पैसे हे विचारले असता त्याने शिवीगाळ केली आणि फोनवरून चौघांना बोलावून घेतले. बाळू दळवे यासह इतर चौघांनी मिळून पैसे का देत नाही, म्हणत गजासह वायरने मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे भीतीने दिलीप डापकर पळून गेले. त्यानंतर दुकानात असलेला कामगार सुदाम सोपान शिंदे (रा.एलआयसी ऑफीस जवळ, अंबाजोगाई) याला मारहाण करत बाळू दळवे व इतर चौघांनी गल्ल्यातील ४ हजार रुपये काढून घेतले. आणि डीव्हीआर काढून घेऊन पळून गेले, असे दिलीप डापकर यांनी फिर्यादीत म्हटले. याप्रकरणी बाळू दळवे यासह अज्ञात चौघांवर शिवीगाळ, गंभीर मारहाण, जीवे मारण्याची धमकी व खंडणी मागितल्या प्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोह.राजेंद्र नन्नवरे हे करीत आहेत.

Tagged