crime

शेळी विकल्याच्या वादातून नातवाकडून आजीचा खून!

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


अंबाजोगाई तालुक्यातील चनई येथील घटना
अंबाजोगाई दि.20 : शहरालगत असलेल्या चनई शिवारातील एका शेतात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात अंबाजोगाई शहर पोलिसांना यश आले आहे. शेळी विकल्याच्या वादातून बेदम मारहाण करून आजीचा खून केल्याच्या आरोपावरून नातवावर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.
सरूबाई हरिभाऊ वारकड (वय 65, रा. चनई, ता. अंबाजोगाई) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. सरूबाई यांचा मुलगा राजेभाऊ (ह.मु. वाशी, जि. उस्मानाबाद) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या कुटुंबाची चनई शिवारात शेतजमीन आहे. आई सरूबाई यांच्याकडे तीन शेळ्या असून त्यांना चारण्यासाठी त्या दररोज शेतात जात. मंगळवारी (दि.16) शेतात गेलेल्या सरूबाई घरी परतल्या नव्हत्या. याबाबत चुलत भावजय संगीता अनंत वारकड यांनी गुरुवारी (दि.18) राजेभाऊ यास कळवले. त्यामुळे आईचा शोध घेण्यासाठी पत्नी छायासह राजेभाऊ शुक्रवारी चनईला आले. दरम्यान, सरूबाई यांचा मृतदेह अमर अनंत वारकड यांच्या पडीक शेतात असल्याची माहिती राजेभाऊ यांना मिळाली. त्यांनी पोलिसांसह सदर ठिकाणी तपासले असता सरूबाई यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला. दरम्यानच्या काळात चौकशी दरम्यान पोलिसांना सरूबाई आणि त्यांचा नातू राहुल बालासाहेब वारकड यांच्यात वाद झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी संशयावरून राहुलला ताब्यात घेतले. शनिवारी सकाळी सरूबाई यांचे शवविच्छेदन झाले असता त्यांचा मृत्यू छातीवर मुक्का मार लागल्याने डाव्या बाजूचे फासळीचे हाड मोडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दुपारी सरूबाई यांचा अंत्यविधी पार पडला. दरम्यान सरूबाई यांच्याकडील तीन शेळ्यापैकी एक शेळी राहुलने अंबाजोगाईच्या मंगळवारच्या बाजारात नेऊन संजय रामकिसन काळे यास विकली होती. याबाबत माहिती झाल्यानंतर सरूबाई आणि राहुलमध्ये वाद झाला. याच वादातून राहुलने सरूबाई यांना छातीवर बेदम मारहाण करून त्यांचा खून केल्याची फिर्याद राजेभाऊ यांनी दिली. सदर फिर्यादीवरून राहुल वारकड याच्यावर कलम 302 अन्वये अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गोपाळ सूर्यवंशी करत आहेत.

Tagged