शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंच्या पदाला स्थगिती!

न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

बीड दि.22 : गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल झालेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली. खांडे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला.

पाच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात तीन ते चार ठिकाणी गुटख्याच्या गोदामावर छापा घालत प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक कुमावत यांच्या पथकाने लाखो रुपयांचा गुटखा पकडला होता. यावेळी हा सगळा धंदा शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर खांडे आणि आबा मुळे यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला.

बीड जिल्ह्याच्या इतिहासात एखाद्या जिल्हाप्रमुख पदावर असलेल्या व्यक्तीवर गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे. या घटनेनंतर सुद्धा खांडे हे जिल्ह्यात पक्षाच्या कार्यक्रमात फिरत असल्याचे दिसून आले.
या सगळ्या प्रकाराची दखल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली आहे.

गुटखा तस्करी प्रकरणात कुंडलिक खांडे यांच्यावर बीडच्या केज पोलिसात गुन्हा दाखल होता. खांडे हे फरार झाले होते. पोलीस त्यांचा शोधही घेत होते. मात्र शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्या बीड दौऱ्यातील एका कार्यक्रमात फरार आरोपी कुंडलिक खांडे हे कार्यक्रमात उघडपणे फिरताना पहायला मिळाले. या प्रकरणी माध्यम प्रतिनिधींनी अनिल देसाई यांना घेराव घातला असता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे कुंडलिक खांडे यांच्यावर लवकरच कारवाई करतील असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार कुंडलिक खांडे यांच्यावर पक्षाने कारवाई केले आहे.

राजकीय सूडबुद्धीने माझ्यावर आरोप- खांडे
माझा गुटखा प्रकरणाशी काही संबंध नाही. मात्र राजकीय सूडबुद्धीने मला या प्रकरणात गोवण्यात आले. आगामी विधानसभेचा मी दावेदार असल्याने मला जाणून बुजून यात गोवण्यात आले. परंतु प्रकरणाची वस्तुस्थिती लवकरच सर्वांसमोर येईल. जामीन मिळेपर्यंत माझ्या पदाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती कुंडलिक खांडे यांनी दिली.

Tagged