पुनर्वसन न झाल्याने पंकजाताई मुंडे यांचा पुन्हा एकदा संताप
बुलढाणा, दि. २१ – विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. भाजपकडून पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल, अशी अपेक्षा होती, परंतु त्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे पंकजा नाराज झाल्या आहेत. रविवारी बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे बोलताना त्या म्हणाल्या, एकवेळ गरीब फाटक्या माणसाच्या पायावर नतमस्तक होईल परंतु पदासाठी कुणासमोरही हात पसरणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
बुलढाण्यातील दुसरबीड येथे माजी आमदार तोताराम कोयंदे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, “माझे माता-पिता, माझे सर्वस्व तुम्ही आहात. एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होईन, पण पदासाठी कुणासमोर हात पसरणार नाही. आमच्या रक्तातच तशी सवय नाही.” “राजकारणात संधी मिळाली नाही, पण लोकांच्या सेवेची संधी सोडणार नाही” अशी शपथ मी गोपीनाथ मुंडे यांना अग्नी देताना घेतली होती असे सांगतानाच पद असो वा नसो, जनतेच्या सेवेला प्राधान्य देईन, असे पंकजा पुढे म्हणाल्या. कार्यकर्त्यांना आणि जनतेला कधीच अंतर देणार नाही, असेही त्या म्हणाल्या.