बीड जिल्ह्यातील सर्वाधिक महाविद्यालयांचा समावेश
बीड : बीएड, बीपीएड व विधि या शाखेतील पूर्णवेळ प्राचार्य, पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळाचा अभाव असलेल्या ३३ महाविद्यालयांना येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी अपात्र ठरविण्याचा मोठा निर्णय मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला आहे. शैक्षणिक दर्जाबाबत व्यावसायिक महाविद्यालयांवर ही कठोर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी यातून दिले आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शैक्षणिक विभागाने गेल्या आठवड्यात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या चार महाविद्यालयांची येत्या वर्षातील प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आता विद्यापीठाशी संलग्नित बीएड, बीपीएड, एमएड, एमपीएड, एलएलबी व एलएल एम अभ्यासक्रमाच्या ३३ महाविद्यालयांना नाहरकत प्रमाणपत्र (नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट) नाकारले आहे. राज्य शासनाच्या सीईटी सेलतर्फे या व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश पूर्व परीक्षेची प्रक्रिया सध्या सुरू आहे . या महाविद्यालयांना राज्य शासनाकडे नाहरकत प्रमाणपत्र दाखल करण्याची अखेरची तारीख १२ मे ही होती. या महाविद्यालयात पायाभूत सुविधा व कूशल मनुष्यबळाचा अभाव होता. तसेच पूर्णवेळ प्राचार्य तसेच व प्राध्यापकांच्या नियुक्तयाही महाविद्यालयाने केल्या नव्हत्या. नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन (एनसीटीई) तसेच बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या मानकांप्रमाणे या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच शिक्षक भरती करावी असे विद्यापीठ प्रशासनाने वारंवार बजावले होते. गेल्या तीन वर्षात वारंवार सूचना देऊनही टाळाटाळ करणाऱ्या महाविद्यालयांवर मोठी कारवाईचा निर्णय मा. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला. या निर्णयामुळे आता ६१ पैकी २८ महाविद्यालयेच प्रथम वर्षाचे प्रवेश आपल्या महाविद्यालयात देऊ शकणार आहेत.
बीड जिल्ह्यात सर्वाधिक कॉलेज अपात्र
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात चार जिल्हे असून शहरी व ग्रामीण भागात मिळून बीएड , बीपीएड व विधी या शाखेंतर्गत ६१ संलग्नित महाविद्यालये आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्हयात सर्वाधिक २७ महाविद्यालये असून बीड १७, जालना ६ तर उस्मानाबाद जिल्हयात ११ संलग्नित महाविद्यालये आहेत. यापैकी केवळ २८ महाविद्यालयेच यंदा प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊ शकणार आहेत . तर अपात्र ठरविण्यात आलेल्या महाविद्यालयांची संख्या ३३ असून बीड जिल्ह्यातील सर्वाधिक ११ महाविद्यालयांचा यात समावेश आहे .
पुढील टप्प्यात अभियांत्रिकीचा समावेश
दरम्यान, पारंपारिक पदवी अभ्यासक्रमाच्या चार महाविद्यालयांची गेल्या महिन्यात चौकशी करण्यात आली. या ठिकाणी कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचा अहवाल विद्यापीठाने पाठविलेल्या समित्यांनी दिला होता. यामध्ये शेंद्रा येथील वाल्मिकराव दळवी महाविद्यालय, देवळाईतील डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम महाविद्यालय, कोळवाडी येथील गोविंदराव पाटील जिवरख महाविद्यालय तसेच जालना येथील सी.पी.कॉलेज ऑफ एज्यूकेशन या चार महाविद्यालयांचे प्रथम वर्षाचे प्रवेश यापूर्वीच रोखण्यात आले आहेत. आता पुढच्या टप्प्यात अभियांत्रिकी व फार्मसी अभ्यासक्रमातील महाविद्यालयांचा समावेश असणार आहे . या पुढील काळातही पायाभूत सुविधा तसेच परीक्षेच्या कामात दिरगांई, गैरप्रकार करणा-या महाविद्यालयांच्या विरोधात कडक कारवाईचे आदेश शैक्षणिक व परीक्षा विभागास कुलगुरु यांनी दिले आहेत.
वारंवार सांगूनही सुधारणा न झाल्यामुळे कारवाई : कुलगुरू
पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्ष घेणा-या विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे ही संबंधित महाविद्यालयांची नैतिक जबाबदारी आहे. बीएड, बीपीएड व विधि महाविद्यालयांना प्राचार्य, प्राध्यापक भरती व पायाभूत सुविधा बाबत वारंवार सूचना करण्यात आल्या . एनसीटीई, बार कौन्सिलच्या मानकाप्रमाणे भरती करणे व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे संबंधित महाविद्यालयाचे कर्तव्य आहे. तरीही याकडे दुर्लक्ष करणा-या संस्थाच्या विरोधात विद्यापीठ प्रशासनाने कडक भुमिका घेण्याचे ठरविले आहे, अशी प्रतिक्रिया मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केली. शैक्षणिक गुणवत्ता, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता व पायाभूत सुविधा या बाबतीत कसलीही तडजोड केली जाणार नाही, असेही ते म्हणाले.