बाबरी मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यास हजारोंचा जनसागर

बीड

आपले प्रेम, विश्वास ऊर्जा निर्माण करते : बाबरी मुंडे

वडवणी : माझ्या कुटुंबावर अनेकदा संकटे आली. त्यावेळी आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत, त्या संकटांच्या छाताडावर ठामपणे उभे राहत त्याला परतून टाकण्याचे सामर्थ्य मला दिलेले आहे. आपणा सर्वांचे उदंड प्रेम व विश्वास हा नेहमीच माझ्यात नवी ऊर्जा निर्माण करतो. आपले हे प्रेम असेच अजन्म अविरत मला मिळत राहो हीच यानिमित्त आकांक्षा बाळगतो असे प्रतिपादन माजलगाव मतदार संघाचे भाजपचे युवा नेते बाबरी मुंडे यांनी केले.

शहरातील मंगळवारी (दि.२३) बाबरी मुंडे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. यावेळी हजारोंचा जनसागर लोटला. दोन वर्षाच्या कोरोना संकटानंतर यंदाचा हा वाढदिवस वडवणी शहराच्या इतिहासातील ऐतिहासिक असाच वाढदिवस ठरल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या. दहा दिवसांपूर्वी वडवणी प्रिमियर लीगच्या शुभारंभाच्या औचित्याने सुरु झालेला हा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा म्हणजे तब्बल दहा दिवस अविरत विविध उपक्रमांनी, स्पर्धांनी व उत्साहवर्धक कार्यक्रमांनी पार पडला. वाढदिवसादिनी बाबरी मुंडे यांनी सकाळी चारदरी येथील ग्रामदैवत जागृत हनुमान मंदिरात जाऊन बजरंग बलीचे दर्शन व आशीर्वाद घेतले. त्यानंतर वाढदिवस अभिष्टचिंतनास सुरुवात झाली. सकाळीपासूनच बाबरी मुंडे यांच्या चाहत्यांनी व स्नेहीजणांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी हजेरी लावली होती. यावेळी बाबरी मुंडे यांनी प्रत्येकाच्या शुभेच्छांचा आदरपूर्वक स्विकार करत कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान, पसायदान सेवा प्रकल्प ढेकणमोहा याठिकाणी चिमुकल्यांना अन्नदान व शालेय साहित्याचे वाटप. चिंचवण येथे एकाच वेळी तब्बल ६० केक बाबरी मुंडे यांच्या हस्ते कापण्यात आले, लाडक्या नेत्याची लाडू तुलाही यावेळी करण्यात आली. तसेच, शहरातही छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, स्व.वसंतराव नाईक चौक, व्यापारी बांधवांच्या वतीने बाजारतळ याठिकाणी सत्कार सोहळे पार पडले.

मुंडे भगिनींकडून शुभेच्छा
माजी मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खा.डॉ. प्रीतम मुंडे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष नीलकंठ चाटे आदींनी बाबरी मुंडे यांना भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

Tagged