wadwani nagar panchayat

बाप-लेक आणि काका-पुतण्यांची प्रतिष्ठा पणाला!

बीड वडवणी

वडवणीत लक्षवेधी लढती : सत्ता काबीज करण्यासाठी भाजप-राष्ट्रवादीकडून जबरदस्त व्युव्हरचना

प्रतिनिधी । वडवणी
दि. 13 : वडवणी नगर पंचायत राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे या बाप-लेकांच्या हातून खेचण्यासाठी आ.प्रकाशदादा सोळंके आणि सभापती जयसिंह सोळंके या काका पुतण्याने चांगलीच कंबर कसली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आ.सोळंके चुलते-पुतणे वडवणीत ठाण मांडून होते. त्यांनी भाजपचा एक फुटीर गट आपल्यासोबत घेत आणि काही अपक्षांना साम, दाम करीत फॉर्म माघारी घ्यायला लावण्याची शेवटच्या दिवशी जबरदस्त खेळी खेळली. शिवसेनेने मात्र शेवटपर्यंत चार जागेची मागणी कायम ठेवत राष्ट्रवादीसोबत जाण्याचे टाळले. वडवणीत शिवसेनेला केवळ चारच उमेदवार उभे करता आले. तर इकडे दोघा मुंडे बापलेकांची महिनाभर आगोदरपासूनच प्लॅनिंग असल्याने त्यांनी देखील तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे आता वडवणीत काही ठिकाणी जबरदस्त दुरंगी लढती तर काही ठिकाणी चौरंगी लढती होतील. या ठिकाणी मुंडे बाप-लेक आणि सोळंके काका-पुतणे यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे पहायला मिळत आहे.

वडवणी नगर पंचायतमध्ये 13 जागेसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी एकूण 33 उमेदवार निवडणूक रिंगणार आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा वेळ संपून गेल्यानंतर जयसिंह सोळंके हे देखील प्रचाराला लागल्याचे दिसत होते. मागील पाच वर्षे वडवणी नगर पंचायत राजाभाऊ मुंंडे आणि बाबरी मुंडे यांच्या ताब्यात होती. तर एक वर्ष पूर्णपणे इथे प्रशासकाचा कारभार होता. दोघा बाप-लेकाच्या कार्यकाळात वडवणीत मोठ्या प्रमाणावर विकास झालेला असला तरी या झालेल्या विकासकामात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय, व्यापारी संकूल धुळखात पडून आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. गुंठेवारीच्या व्यवहारात तर आडमाप भ्रष्टाचार झाला असून वडवणीतील जनता यालाच वैतागली असून त्यामुळे परिवर्तन निश्चित असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. त्यातच माजी आ.केशवदादा आंधळे यांचा गट राष्ट्रवादीसोबत असल्याने आमचा विजय कोणीच रोखू शकत नाही हा आत्मविश्वास राष्ट्रवादीच्या नेतृत्वात लढत असलेल्या सर्वच उमेदवारांमध्ये आहे.

तर इकडे बाबरी मुंडे यांनी आपलं पूर्ण लक्ष हे केवळ केलेल्या विकास कामांवर केंद्रीत केले आहे. विरोधकांनी काहीही आरोप केले तरी प्रत्येक आरोपाला उत्तर दिले जाईल, असा सुचक ईशारा बाबरी मुंडे यांच्याकडून देण्यात आला आहे. राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांच्या राजकीय व्युव्हरचना आपल्याला विजय मिळवून देतील. पाच वर्षात केलेली विकास कामे जनतेसमोर असल्याने आणि आम्ही सतत वडवणीत जनतेत असल्या कारणाने आमच्या विजयावर आजच शिक्कामोर्तब झाल्याचे भाजपचे उमेदवार आत्मविश्वासाने सांगत आहेत.

आमदार प्रकाश सोळंके व सभापती जयसिंह सोळंके यांच्या नेतृत्वाखाली माजी सभापती दिनकरराव आंधळे, विनोदकुमार नहार, माजी सरपंच गंपू पवार, विठ्ठल भुजबळ, नागेश डिगे, गुरू प्रसाद माळवदे, माजी सरपंच संभाजी शिंदे, बन्शीधर मुंडे, आण्णा महाराज दुटाळ, संतोष पवार, असलम कुरेशी, परमेश्वर राठोड, भारत जगताप, लक्ष्मणराव आळणे, संचालक भगवानराव लंगे, मोहनराव मुंडे, अ‍ॅड अंनद काळे, तालुकाध्यक्ष बजरंग साबळे, दिनेश मस्के, भानुदास उजगरे, अलगट दत्ता, आमोल आंधळे, अंकुश वारे, सतिष बडे, सभापती बळीराम आजबे, अंगद घुगे, आबेद भाई, खलील पठाण, सचिन लंगडे, जि.प. सदस्य औदुंबर सांवत, आदी नेते परिश्रम घेत आहेत.

शिवसेनेचं काय होणार?
जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी शिवसेनेसाठी एकूण चार जागा आ.प्रकाश सोळंके यांच्याकडे मागितलेल्या होत्या. आ.सोळंके यांच्याकडून 3 जागा देण्याची तयारी दर्शविण्यात आली. मात्र शिवसेनेकडून त्यास नकार देण्यात आला. ऐनवेळी शिवसेना स्वतंत्र झाल्याचे पाहून शिवसेनेच्या एका उमेदवाराने घड्याळ हातात बांधली. इतर तीन उमेदवारांचा अर्ज छाननीतच उडाला. तर प्रभाग क्रमांक 3, 10, 11, 17 मध्ये उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे शिवसेनेचा फायदा तोटा कुणाला हे काही दिवसात दिसून येईल.

54 जणांची माघार
उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी तब्बल 54 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. तेरा जागेसाठी 33 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. प्रभाग क्रमांक 1, 10 व 12 मध्ये तिरंगी तर प्रभाग क्रमांक 11 व 17 मध्ये चौरंगी लढत होणार असून 11 जागांसाठी भाजप- राष्ट्रवादी व राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार आमनेसामना लढत देणार आहेत. शिवसेना 4 तर कॉग्रेस 2 जागेवर स्वबळावर निवडणूक लढवणार आहे.

अशा होणार लढती…
प्रभाग क्रमांक 1
1) उजगरे राणी परमेश्वर – भाजपा
2) उजगरे सुरेश वसंत – काँग्रेस
3) वाघमारे द्रोपदी भगवान – राष्ट्रवादी काँग्रेस

प्रभाग क्रमांक 2
1) मुंडे मंगल राजाभाऊ- भाजपा
2) मुंडे सुग्रीव कारभारी – राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक 3
1) बडे सतीश बबनराव- राष्ट्रवादी
2) सानप देविरथ शिवराम- भाजप

प्रभाग क्रमांक 7
1) मुंडे बन्सी केशवराव – राष्ट्रवादी पुरस्कृत
2) जमाले आत्माराम अंकुश – भाजपा

प्रभाग क्रमांक 8
1) जगताप गोपिकाबाई अभिमन्यू – राष्ट्रवादी
2) पठाण महताबी अब्दुल- भाजपा

प्रभाग क्रमांक 9
1) कुरेशी असलम अन्सार – राष्ट्रवादी पुरस्कृत
2) कुरेशी जाकेर बिलाल – भाजपा

प्रभाग क्रमांक 10
1) उजगरे लतिका भानुदास – राष्ट्रवादी
2) उजगरे मीरा भीमराव – भाजप
3) राऊत छाया कल्याण- शिवसेना

प्रभाग क्रमांक 11
1) आळणे नेहा नागेश – राष्ट्रवादी
2) फासे गणेश किसनराव- भाजपा
3) खारगे लहु लक्ष्मण- भाकप
4) टकले विष्णू तुकाराम – शिवसेना

प्रभाग क्रमांक 12
1) अलगट राधाबाई दिगंबर – राष्ट्रवादी
2) ढोले मिरा सुधीर- भाजपा
3) चाटे अश्विनी बाबासाहेब- शिवसेना

प्रभाग क्रमांक 14
1) शिंदे मीनाक्षी संभाजी – राष्ट्रवादी
2) शिंदे मोनिका श्रीराम – भाजपा

प्रभाग क्रमांक 15
1) नहार रुपिका विनय – भाजपा
2) दुटाळ लक्ष्मीबाई शिवाजी- राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक 16
1) डिगे रंजना नागनाथ- राष्ट्रवादी पुरस्कृत
2) गुरसाळी कल्याणी रामप्रसाद- भाजपा

प्रभाग क्रमांक 17
1) उजगरे उषा महादेव – भाजपा
2) घाडगे उषा उत्तम- राष्ट्रवादी
3) मस्के सावित्रा बाबासाहेब- काँग्रेस
4) पाटोळे आशा ज्ञानेश्वर- शिवसेना

Tagged