NSL shugar factory

माजलगावात अतिरिक्त ऊस असताना दलाल पोसण्यासाठी पाथरीला टोळ्या

न्यूज ऑफ द डे माजलगाव शेती

गिरीश लोखंडे हे पाप कशासाठी?

माजलगावच्या शेतकर्‍यांनी फाशी घ्यायची का?

बालाजी मारगुडे । बीड
दि. 14 : एनएसएल शुगरच्या कार्यक्षेत्रातच अतिरिक्त ऊस आहे. मात्र असे असताना कारखान्याकडून पाथरी तालुक्यात टोळ्या टाकल्या जातात. कारण एकच गेटकेन ऊसात अधिकारी, मुकादम यांना मोठं घबाड मिळतं. आणि गेटकेन ऊस का आणता असे कोणी विचारले तर प्रत्येक वर्षी तिकडचे शेतकरी आम्हाला ऊस देतात हे कारण सांगितले जाते. मुळात माजलगावात गेल्या दहा वर्षापासून अतिरिक्त ऊस असतो. येथूनच जवळपास 11 कारखाने ऊस नेतात मात्र एनएसएल शुगरलाच प्रत्येक वेळी पाथरीतून ऊस का आणावा लागतो? केवळ दलाल पोसणे आणि त्यातून आपला स्वार्थ साधणे एवढं एकच काम एमडी गिरीश लोखंडे करीत आहेत. गेटकेन ऊस आणल्यामुळे स्थानिक शेतकर्‍यांची प्रचंड हेळसांड तर होतंच आहे परंतु त्याचा परिणाम एफआरपीवर देखील होत आहे.


एनएसएल शुगरने किमान यावर्षी तरी संबंधीत शेतकर्‍यांना कल्पना देऊन पुढच्या वर्षीसाठी नोंदी घेऊ नयेत. मात्र दरवर्षी बाहेरूनच नोंदी वाढवल्या जातात. दहा एकरची स्लीप देऊन 40 एकर ऊस अधिकारी, कर्मचारी गाळपासाठी घेऊन येतात. परिणामी कारखाना स्थळावर काटा करण्याचे नियोजनच पार कोलमडून जाते. स्थानिक शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टरचे तीन-तीन दिवस मापं होत नाहीत. तर दलाल आणि कर्मचार्‍यांच्या ट्रॅक्टरचे लगोलग माप होतात. तरीही शेतकरी निमूटपणे हे सगळं गेल्या दहा वर्षापासून सहन करीत आला आहे. आपला ऊस जाणार नाही हीच एकमेव भिती शेतकर्‍यांना घातली जात आहे. हे कुठंतरी थांबायलाच हवे. आताही मागच्या वर्षी ज्यांचा ऊस ऑक्टोबर महिन्यात तोडला त्यांचा प्रोग्राम आता मार्च महिन्यात टाकून देण्यात आला आहे. आणि ज्यांचा ऊस मागच्या वेळी मार्च महिन्यात तोडला त्याचा तोडणी प्रोग्राम ऑक्टोबरमध्ये टाकला गेलाय. नऊ महिन्यात ऊस घेऊन जाण्यासाठी अधिकारी, कर्मचारी मागच्या सहा महिन्यांपासूनच कामाला लागलेले होते. ज्या शेतकर्‍यांचा अशाप्रकारे ऊसा जातोय त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात मात्र ज्यांच्या ऊसाला 13 ते 16 महिन्यांचा कालावधी होतो त्यांची काय अवस्था होत असेल याची जाणीव इतर शेतकर्‍यांनी ठेवायलाच हवी.


नेमकी एनएसएलच्याच अधिकार्‍यांना मारहाण का होते?
इतर कुठल्याच कारखान्याच्या कर्मचार्‍यांना कोणी मारहाण केल्याचे ऐकीवात नाही परंतु एनएसएल शुगर पवारवाडीचे अधिकारी प्रत्येक गाळपावेळी मार का खातात? कारण येथील अधिकार्‍यांचा शेतकर्‍यांशी कधी संबंधच येत नाही. शेतकरी अधिकार्‍यांकडे गेले की अधिकारी एका विशिष्ट दलालाकडे त्याला पाठवून देतात. दलाल पैसे घेऊन नोंदी खालीवर करतो. त्यामुळे शेतकर्‍याचा संताप निघतो. मग तो अधिकार्‍यांना रट्टे द्यायला मागेपुढे पाहत नाही. आणि मग असं काही झालं की एमडी. गिरीश लोखंडे कारखाना बंद करण्याची धमकी देतात. लोखंडे यांना व्यवस्थापनाचा विषय झेपत नसेल तर त्यांनी हैद्राबादी मालकाची गुरे-ढोरे सांभाळायला हवीत. पण आमच्या गरीब बिचार्‍या शेतकर्‍यांचा जीव कशाला खाऊ नये.


पालकमंत्र्यांनी येथील त्रुटींची नोंद घ्यावी
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याही मतदारसंघातून एनएसएल शुगरला ऊस गाळपासाठी आणला जातोय. येथील शेतकर्‍यांचं त्याबद्दल काहीच दुमत नाही. मात्र पाथरीचा ऊस इकडे कशासाठी? आपल्या मतदारसंघातील ऊस जातोय म्हणून पालकमंत्र्यांनी येथील त्रुटींवर पांघरून घालू नये. बीड जिल्ह्यातील सगळ्याच शेतकर्‍यांचा ऊस कसा जाईल यासाठी नियोजनात्मक आणि धोरणात्मक कायमस्वरूपी उपाययोजना या कारखान्याकडून करवून घ्याव्यात, एवढी रास्त अपेक्षा ऊस उत्पादक शेतकरी करीत आहेत.

Tagged