विनापरवाना विदेशी दारुची विक्री करणार्‍या अतिथी हॉटेलवर छापा!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


आयपीएस पंकज कुमावत व दारुबंदी विभागाचे अधीक्षक घुले यांची कारवाई
बीड
दि.14 : शहरातील अतिथी हॉटेल काही महिन्यापूर्वी सील केले होते. तरीही विनापरवाना विदेशी दारुची विक्री केली जात होती. याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. त्यांनी व राज्य उत्पादन शुल्क विभाग बीड अधीक्षक नितीन घुले यांनी संयुक्तरित्या छापा मारला. यावेळी 91 हजारांची विदेशी दारु जप्त करण्यात आली. तसेच दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील अतिथी हॉटेलमध्ये विनापरवाना विदेशी दारुची विक्री केली जात होती. मंगळवारी (दि.14) रात्री या हॉटेलमध्ये छापा मारत विविध विदेशी 91 हजार 765 रुपयांची दारु जप्त करण्यात आली. तसेच गौस सत्तार पठाण (वय 39 रा.बालेपीर नगर रोड बीड) यास अटक केली. तर मुख्य आरोपी निखिल सुरेंद्र जयस्वाल हा घटनास्थळावरुन फरार झाला आहे. दोघांवरही महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या कलम 65 ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक आर.ए.घोरपडे, ए.एस.नायबळ, जवान आमीन सय्यद, सचिन सांगळे, नितीन मोरे, शहाजी लोमटे, जवान चालक अशोक शेळके यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी निरीक्षक आर.ए घोरपडे हे करत आहेत. तसेच सर्व नागरिकांना जाहिर आवाहन करण्यात येते की, अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक व साठवणूक संदर्भात माहिती मिळाल्यास राज्य उत्पादन शुल्क बीड विभागास कळविण्यात यावी असे आवाहन नितीन घुले यांनी केले आहे.

Tagged