court

परळी खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे परळी बीड

घराकडे वाईट नजरेने पाहत असल्याच्या
संशावरुन मित्रानेच केला होता मित्राचा खून

 अंबाजोगाई : आपल्या घरावर वाईट नजरेने पाहत असल्याच्या संशयावरुन परळी येथील बरकत नगर भागातील मित्रानेच आपल्या मित्राचा नंदागौळ शिवारात दुचाकीवर बसल्यानंतर पाठीमागून पोटात चाकूचे वार करत खून केला. मयत झाला नसेल म्हणून शेवटी त्याने चाकूने गळा चिरला. पुरावा नष्ट केला तरी परळी ग्रामीण पोलीसांनी आरोपीला खाक्या दाखवताच त्याने सर्व गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेत साक्षीदार नसला तरी रक्ताने माखलेले कपडे, दुचाकी व चाकुवर लागलेल्या रक्ताचे डाग हा पुरावा ग्राह्य धरुन येथील जिल्हा व सत्र न्यायालय क्र.3 च्या न्यायाधिश माहेश्र्वरी पटवारी यांनी आरोपीस जन्म ठेपेची शिक्षा सुनावत 15 हजार रुपयांचा दंड सुनावला आहे.

परळी शहरातील बरकत नगर भागात मयत शेख मकदूल शेख कलंदर, (वय 30) व आरोपी शेख समीर शेख वल्ली हे दोघेजण जिवलग मित्र होते. मयत शेख मकदूल याच्या घरावर आरोपी शेख समीर शेख वल्ली वाईट नजरेने पाहत होता. दोघेही दि.3 डिसेंबर 2018 रोजी (एम.एच.23-ए-8616) या दुचाकीवरुन अंबाजोगाईला पार्टी करण्याच्या बहाण्याने आले. पार्टीनंतर दोघेही नंदागौळच्या मार्गे परळीकडे निघाले. अंबाजोगाईतून दुचाकीवरुन दोघांना पाहिल्याच्या एका साक्षीदाराने न्यायालयासमोर साक्ष दिली. सदरील दुचाकी नंदागौळ शिवारात येताच आरोपी शेख समीर शे.वल्ली याने मयत शेख मकदूल शेख कलंदर याच्या पोटात धावत्या दुचाकीवरुन चाकू खूपसला. मयत हा जागी कोसळताच त्याने पोटातील चाकू काढत आकरा वेळा पुन्हा पोटात चाकू खुपसला. यातूनही तो मयत झाला नसावा म्हणून त्याने बाराव्यावेळेस त्याचा गळा चिरला. या घटनेत वापरलेला चाकू नंदागौळ शिवारात फेकून देत दुचाकी पुलाखाली लपून ठेवत त्यावर गवत झाकून ठेवली. रक्ताने माखलेले कपडे घरातील कपाटात लपवून ठेवत त्याने अपघात झाल्याचा बनाव केला. परंतू नातेवाईकांनी त्याच्यावर संशय घेतल्याने परळी ग्रामीण पोलीसांनी त्याला ताब्यात घेत पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी या घटनेचे वास्तव हकिकत मांडली. यानंतर परळी ग्रामीणचे सपोनि.एम.एम.शेळके यांनी तपास करुन सदरील आरोपीने घटनेत वापरलेली दुचाकी, चाकु व रक्ताने माखलेले कपडे जप्त करुन आरोपीविरुद्ध दोषारोपत्र अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. सदरील प्रकरणाची येथील न्यायालयात सुनावणी दरम्यान आठ साक्षीदारांची साक्ष घेतली. यातील एकाने सदरील दोघांना दुचाकीवरुन जाताना पाहिल्याची साक्ष कोर्टापुढे महत्वपुर्ण ठरली. रक्ताने माखलेल्या कपड्यांची तपासणी केल्यानंतर सदरील रक्त हे मयताचे आढळून आले. प्रयोगशाळेच्या रक्ताचा अहवाल व दुचाकीवरुन दोघांना जाताना पाहणार्‍याची साक्ष ग्राह्य धरत जिल्हा व सत्र न्यायालय क्र.3 च्या न्या.माहेश्र्वरी पटवारी यांनी सरकार पक्षाने मांडलेला युक्तिवाद, प्रयोगशाळेचा आलेला अहवाल व घटनेत वापरलेली दुचाकी व चाकू हे सर्व गुन्हात ग्राह्य धरुन आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावत रु.15 हजारांचा दंड सुनावला. सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड.लक्ष्मण फड यांनी भक्कम बाजू मांडली. सदरील निकाल हा आरोपी जिल्हा कारागृहात असल्यामुळे व्हि.सी.द्वारे सुनावला. या प्रकरणाकडे परळी तालुक्याचे लक्ष लागले होते. घटनेच्यावेळी एकही साक्षीदार नसताना न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने मयताच्या कुटूंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.

Tagged