krushi-vibhag

बोगस कापसाच्या बियाणांची विक्री; दुकानदारावर गुन्हा

बीड शेती

बोगसगिरीविरुद्ध कृषी विभागाकडून कारवाई
बीड : जिल्ह्यात सर्रासपणे बोगस बियाणांची विक्री करनाऱ्याचा सुळसुळाट सुरु झाला असून काही कृषी सेवा केंद्रचालकांकडून बीटी बियाणांच्या नावावर बोगस बियाणे विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर दरम्यान, सोमवारी बोगस बियाणे विक्री केल्याच्या आरोपावरुन कृषी विभागाने कपाशीच्या ४६ बॅग जप्त केल्या.

कोणत्याही प्रकारची मान्यता, बॅच नंबर तसेच कंपनी रजिस्टर नसताना देखील बोगस कापूस बियाणे विक्री केली जात असल्याची तक्रार सोमवारी एका शेतकयाने बीड कृषी विभागाकडे केली होती. त्यानुसार तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी सापळा रचला. तक्रारदार शेतकऱ्याला ५०० च्या चार नोटा देऊन त्याचे नंबर लिहून घेतले व बियाणे खरेदी करण्यास पाठवले. यावेळी मोंढा परिसरातील एमआयडीसी रोडवरील व्यंकटेश अ‍ॅग्रो एजन्सीमधून २ हजार रुपये देऊन २ कापूस बियाणांचे पॉकेट शेतकऱ्याने विकत घेतले. या बियाणांची पाहणी केली असता, हे कापसाचे बोगस बियाणे असल्याचे जाधव यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर गुणनियंत्रण अधिकाऱ्यांचे पथक सोबत घेऊन व्यंकटेश अ‍ॅग्रो एजन्सीवर छापा मारला. यावेळी ‘बॉडीगार्ड २’ नावाचे कापसाचे बोगस बियाणे शेतकऱ्यांना विक्री करून नामांकित कंपनीच्या नावे पावती दिली जात असल्याचे दिसून आले. कृषी सेवा केंद्रात छापा मारला त्यावेळी पाहणी केली असता ‘बॉडीगार्ड२’ हे बोगस बियाणे मूग बियाणाच्या पोत्यात आढळून आले. अशा बोगस बियाणांच्या जवळपास ४६ बॅग जप्त केल्या. त्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी व्यंकटेश अ‍ॅग्रो एजन्सीचे चालक केदारनाथ रमेशलाल जाजू यांना ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान याप्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव, तंत्र अधिकारी गोविंद कोल्हे, बी.एम.खेडकर पंचायतसमिती कृषी अधिकारी, मोहीम अधिकारी बी.आर. गंडे, जेबी कुलकर्णी, जळक, सावरे, वैद्य भाराडे, काशीद यांनी केली.

दरम्यान मान्यताप्राप्त कापूस बियाणाच्या पाकीटाची किंमत ही ७३० रुपयांपेक्षा जास्त नसावी, असा शासनाने नियम घालून दिला आहे. चढ्या दराने कापूस बियाणांची विक्री केली जातअसेल तर शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. त्यामुळे वेळीच कारवाई करता येईल व शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी दिली.

Tagged