सिरसाळा दि.15 : सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतामध्ये सत्तर वर्षीय वृद्धाचा शिर नसलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. घटनास्थळी सिरसाळा पोलीसांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वारातीमध्ये दाखल केला आहे. हा घातापाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मारुती नामदेव उगले (वय 70 रा.हिवरा गोवर्धन) असे मयताचे नाव आहे. 13 जानेवारी दुपारपासून मारुती उगले हे बेपत्ता होते. घरचे नातेवाईक यांनी शोध घेतला परंतु ते दिसून आले नाही. शनिवारी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान त्यांच्या उगले वस्ती जवळील त्यांच्या शेतातच त्यांचे शिरधडावेगळे केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी घटनास्थळी दाखल होवून प्रेतास रात्री अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. नेमका हा मृत्यू कशामुळे झाला? हे शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे. मृतदेहाचे शिर पोलीसांना सापडले नसून जंगली प्राण्यांनी खाल्ले असल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त करत पुढील तपास सुुरु आहे.