आयोजकावर गुन्हा नोंद करून इंदुरीकरांना पुढच्या किर्तनासाठी रान मोकळं?

केज क्राईम

मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धसांवर गुन्हा

केज/नांदूरघाट
दि.18 : नांदूरघाटमध्ये सोमवारी विनोदी किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या किर्तनाचा कार्यक्रम पार पडला. जिल्ह्यात जमावबंदी असताना इंदुरीकरांच्या किर्तनाला हजारोंचा जमाव जमला. सोशल डिस्टन्स नाही, मास्क नाही. आज ‘कार्यारंभ’ने याबाबत आवाज उठविल्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण तापले. त्यानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा नोंद करून पोलीस मोकळे झाले. मात्र राज्यात दररोज चार किर्तन करून लाखोची गर्दी खेचणारे इंदुरीकर महाराज मात्र पोलीसांनी मोकळे सोडले आहेत.
इंदुरीकर दररोज कुठे न कुठे किर्तन घेत फिरत आहेत. एका किर्तनासाठी 25 ते 30 हजार रुपये ते घेत असतात. म्हणजे त्यांचा कार्यक्रम समाज प्रबोधनापेक्षा व्यवसायिक आहे. असे असताना पोलीस जर केवळ आयोजकांवर गुन्हा नोंद करून हात वर करीत असतील तर याला काय म्हणावे? पोलीस किती ठिकाणच्या आयोजकांवर गुन्हे नोंद करणार? त्यापेक्षा एकदाच इंदुरीकर महाराजांवर गुन्हा नोंद करा. म्हणजे ते कुठेही कार्यक्रम घेत फिरणार नाहीत.
कोरोना काळात इंदुरीकर महाराज सतत वादग्रस्त विधान करीत फिरत आहेत. काल-परवा त्यांनी माळकर्‍यांना कोरोना होत नाही म्हणत एकप्रकारे लोकांमध्ये अंधश्रध्दा पसरवण्याचं काम केलं आहे. यापुर्वी त्यांनी मी लस घेणार नाही असे सांगून लोकांनाही त्यापासून परावृत्त करण्याचं काम केलं होतं.

केवळ किर्तनाचा कार्यक्रम टारगेट का?
आयोजक म्हणून मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्या गुन्हा दाखल झाल्यानंतर ते म्हणाले, एकीकडे राजकीय नेत्यांच्या मोठमोठ्या सभा होत असताना धार्मिक कार्यक्रमावरच गुन्हा नोंद का? माझ्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी प्रशासनाने जेवढी तत्परता दाखवली तेवढी तत्परत इतर राजकीय नेत्यांबाबत दाखवणार का? संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमातून माझ्यावर गुन्हा नोंद होत असेल तर असे अनेक गुन्हे माझ्यावर नोंद झाले तरी हरकत नाही. भगवानबाबा यांचे विचार समाजात पसरवणे गुन्हा असेल तर असा गुन्हा मी वारंवार करीत राहील, अशी प्रतिक्रीया आयोजक सुमंत धस यांनी व्यक्त केली.

कीर्तनाला गर्दी जमते, मग शाळा का सुरू नाहीत?
ठिकठिकाणी होत असलेल्या कीर्तनाला हजारोंची गर्दी जमते मग शाळा का सुरू नाहीत असा सवाल समाजमाध्यमांवर अनेकांकडून केला जात आहे.

Tagged