धनंजय मुंडेंची वचनपूर्ती; १ कोटी ३२ लाख ७० हजार रुपये मंजूर
बीड : जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीच्या कामासाठी सामाजिक न्याय विभागाने १ कोटी ३२ लाख ७० हजार रुपये निधी मंजूर केला असून, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बर्दापूर व परिसरातील अनुयायांना दिलेल्या शब्दाची पूर्तता केली आहे.
बर्दापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मागील काळात हानी झाल्याने तीव्र असंतोष पसरला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्याच जागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने स्मारकाच्या कामासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून १ कोटी ३२ लाख ७० हजार रुपयांच्या प्रस्तावित रकमेस आज मंजुरी दिली असून, सदर कामाची निविदा प्रक्रिया तात्काळ राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सन २०२१-२०२२ च्या आर्थिक वर्षातच ही रक्कम वितरित केली जाणार असल्याने या कामाला लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.