crime

आमदारांच्या शिपायाला लुटले; आमदार पतींना दिली धमकी

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे

अंबाजोगाई शहरातील खळबळजनक घटना

अंबाजोगाई : आ. नमिता मुंदडा त्यांच्या परिवारासह शुक्रवारी (दि.21) ऊसाचा रस पिण्यासाठी रसवंतीवर गेल्या असता मद्यधुंद असलेल्या सहा जणांनी आमदारांच्या शिपायाच्या गळ्याला चाकू लावून त्याचे लॉकेट आणि रोख साडेसहा हजार रुपये काढून घेतले. यावेळी अक्षय मुंदडा शिपायाच्या मदतीला धावले असता त्यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही खळबळजनक घटना शहराजवळ घडून असून शहरातील बिघडत चाललेल्या वातावरणाची प्रचीती खुद्द आ.मुंदडांनाही आली.

मुराजी प्रकाश साखरे असे आ. मुंदडा यांच्या शिपायाचे नाव आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा हे रस पिण्यासाठी बीड रोडवरील एका रसवंतीमध्ये गेले. मुराजी रस पिऊन रसवंतीच्या बाहेर आला असता त्याच वेळी शेजारच्या हॉटेलमधून लखन भाकरे (रा. अंबाजोगाई) हा अन्य पाच जणांसोबत तिथे आला. त्याने मुराजीच्या गळ्याला चाकू लावून दिड तोळ्याचे सोन्याचे लॉकेट आणि खिशातील 6 हजार 400 रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि साथीदारांकडे दिले. मुराजीचा आरडाओरडा ऐकून अक्षय मुंदडा आणि अन्य काहीजण धावत आले आणि त्यांनी लखन भाकरे याला पकडले तर त्याचे साथीदार शेजारच्या शेतात पळून गेले. यावेळी लखनने अक्षय मुंदडा यांना मला सोड नाहीतर तुला खल्लास करून टाकीन, अख्ख्या अंबाजोगाईत माझी दहशत आहे अशी धमकी दिली. त्यानंतर अक्षय मुंदडा यांनी फोन करून पोलिसांना बोलावून घेतले आणि लखनला त्यांच्या हवाली केले असे तक्रारीत नमूद आहे. सदर तक्रारीवरून अंबाजोगाई शहर ठाण्यात लखन भाकरे आणि अन्य पाच जणांवर कलम 395, 397 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास बालासाहेब पवार करत आहेत.

Tagged