म्हाडाच्या परिक्षेतही ‘वडझरी पॅटर्न’, डमी उमेदवार बीडमध्ये पकडला

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

पो.कॉ.संगीता सिरसाट यांची कारवाई

बीड : आरोग्य भरतीनंतर म्हाडाच्या परीक्षेतही वडझरी पॅटर्न राबविण्यात आल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. वडझरी (ता.पाटोदा) येथील उमेदवाराच्या जागी परीक्षा देण्यासाठी आलेला डमी उमेदवार संशय आल्याने पोलिसांनी पकडला आहे.

अर्जुन बाबुलाल बिघोत (वय २५, रा.कन्नड जि. औरंगाबाद) असे पकडण्यात आलेल्या डमी उमेदवाराचे नाव आहे. तो शहरातील दिशा कॉम्प्युटर या म्हाडा परीक्षेच्या परीक्षा केंद्रावर आला होता. तो डमी उमेदवार असल्याचा संशय आल्याने परीक्षा केंद्र चालकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे ओळखपत्र आढळून आले नाही. याशिवाय त्याच्याकडे डिवाइस व इतर साहित्य सापडले. त्याची चौकशी केली असता तो राहुल किसन सानप (रा.वडझरी ता.पाटोदा) या विद्यार्थ्याच्या जागी परीक्षा देण्यासाठी आल्याचे उघड झाले. घटनास्थळावरून अर्जुन बिघोट हा पळून गेला होता. मात्र बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी संगीता सिरसाट यांनी पाठलाग करून त्याला पकडले आणि शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या डमी उमेदवाराची पोलीस चौकशी करत आहेत.

महिला पोलिसाच्या धाडसाचे कौतुक
तपासणीदम्यान आरोपीने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र महिला पोलीस कर्मचारी संगीता सिरसाट यांनी आरोपीला एक किलोमीटर पाठलाग करत पकडले. यावेळी परीक्षा केंद्रावर अनके विद्यार्थी व पालक उपस्थित होते. परंतु त्यातील एकही जण आरोपीला पकडण्यासाठी पुढे आला नाही. महिला पोलिसाच्या धाडसाचे मात्र सर्वत्र कौतुक होत आहे.

Tagged