अंबाजोगाईत प्रा.कमलाकर कांबळे यांचा नागरी सत्कार
अंबाजोगाई : अंबाजोगाईतून मराठीचा उगम झाला आहे. त्यामुळे वर्षांनुवर्षे प्रलंबित असलेली मराठी विद्यापीठ स्थापनेची मागणी आता महाविकास आघाडी सरकारने पूर्ण करावी. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देणार असून पाठपुरावा करणार आहे. हिंदी, संस्कृत अशी विद्यापीठे असून याच धर्तीवर सरकारने अंबाजोगाईत मराठी विद्यापीठ स्थापनेचा तातडीने निर्णय घेण्यास काही हरकत नाही, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
येथील भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध संस्थेत सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले प्रा.कमलाकर कांबळे यांचा केंद्रीय ना. रामदास आठवले यांच्या उपस्थितीत शहरातील आद्यकवी मुकुंदराज सभागृहात आज (दि.८) भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ना.रामदास आठवले हे बोलत होते. या कार्यक्रमास आमदार विक्रम काळे, रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित आहेत. पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले, मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी संघर्ष करावा लागला. १७ वर्षे सतत लढा दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात मी सहभागी होत असताना मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याच्या अटीवर मी सोबत गेलो. अखेर सर्व पक्षांच्या पाठिंब्याने ठराव संमत झाला. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. या लढ्यात प्रा.कमलाकर कांबळे सरांसारख्या अनेकांचे योगदान आहे. विद्यापीठाच्या प्रश्नावर लढा देतानाच गायरानधारकांच्या प्रश्नावर लढलो, तेव्हा जमीनधारकांना त्याच ठिकाणी कायम राहण्यास मुभा दिली गेली. दलित पँथरमध्ये असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी सर्वप्रथम केली. आजही मराठा आरक्षण मिळावे ही पक्षाची भूमिका आहे. तसेच, ओबीसीच्या प्रश्नावर आम्ही सोबत आहोत. अंबाजोगाई रेल्वे आणण्याची मागणी केली आहे. त्यामुळे लवकरच आपण रेल्वेमंत्र्यांना भेटू अंबाजोगाईला रेल्वे आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आम्ही रेल्वे आणल्यास आमच्या पक्षाला मते द्यावीत. याप्रश्नी आम्ही पाठपुरावा करू, रस्त्याचा प्रश्न असतात तर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना बोलून मिनिटात प्रश्न मार्गी लावला असता, असेही आठवले म्हणाले. रेल्वेसह अंबाजोगाईच्या मराठी विद्यापीठ प्रश्न आपण पाठपुरावा करणार आहे. याठिकाणी मराठी विद्यापीठ झाल्यास कुलगुरू पदासाठी प्रा.कमलाकर कांबळे यांचा विचार करू, असे ते म्हणाले. त्यामुळे प्रा. कमलाकर कांबळे यांनी कोणत्याही पक्षाने आमंत्रण दिले तरी कुठेही जाऊ नये, त्यांना लवकरच पक्षाकडून जबाबदारी देण्यात येईल, असे ते म्हणाले.