पाच वर्षे विकासासाठी की न्यायालयाच्या पायर्‍या झिजवण्यासाठी?

बीड

– जिल्ह्यात विजयी मिरवणुकीत अनेक गावात राडा; परस्पर तक्रारीवरुन शेकडोजणांवर गंभीर गुन्हे नोंद

केशव कदम

बीड : पंचायत राजमधील सर्वात छोट्या पण महत्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. गाव-खेड्याचा विकास व्हावा, ग्रामीण भागातील नागरिकांना सर्व सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात म्हणून सरपंच नावाचा कारभारी नेमला जातो. मात्र अलीकडच्या काळात हे सूत्र पुर्णपणे बदलले आहे. गावकर्‍यांनी निवडलेला हा कारभारी गावासाठी कमी अन् स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी जास्त प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आजचा कारभारी हा कुठल्याही थराला जाण्याची तयारी ठेवताना दिसतो. साम, दाम, दंड, भेद याच्या जोरावर विकासाला बाजूला ठेवत विरोध करणार्‍या प्रत्येकाचा काटा काढण्यासाठी प्रयत्न करतोय. यामुळे निवडणूक झाल्यानंतर गावागावात रक्तरंजित राडा पहायला मिळत आहे. किरकोळ झालेल्या वादाला गंभीर गुन्ह्याची झालर जोडल्यामुळे पिढ्यानपिढ्यांची दुष्मनी निर्माण होत आहे. तक्रार देणारा आणि आरोपी होणारा हे दोघेही दुरचे नसतात. कुठे काका-पुतण्या, मामा-भाच्चे, बहिण-भाऊ अशी रक्ताची नाते तर दैनंदिन जिवनात एकमेकांना कायम गरज असणारे असतात. पण या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक कौटुंबिक नाते संबंध असलेले कायमचे कट्टर विरोधक होतात. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजयाचा रक्तरंजित राडा झाला असून अनेकांवर गुन्हेही दाखल झाले आहेत. यामध्ये दोन्ही गटातील कार्यकर्ते असल्याने पाच वर्षात गावाचा विकास होणार? की, न्यायालयाच्या पायर्‍या झिजवण्यातच जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

माळेगावात ग्रामपंचायतच्या मिरवणुकीत दोन गटात वाद  
-परस्पर विनयभंग, जीवे मारण्याच्या धमक्यांच्या तक्रारी; दोन्ही गटाच्या 50 ते 60 जणांवर गुन्हा
शिरुर : तालुक्यातील चकलांबा हद्दीतील माळेगाव चकला येथे मंगळवारी (दि.20) सायंकाळच्या सुमारास ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या गटाने मिरवणूक काढली. यावेळी विजयी व पराभूत गटातील उमेदवार कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. या प्रकरणी दोन्ही गटाने पोलीसात तक्रार दिली असून विनयभंगासह इतर कलमान्वय पन्नासपेक्षा अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विजयी गटातील महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विजयी मिरवणूक काढत ग्रामस्थांचे आभार मानत होते. यावेळी ज्ञानेश्वर रावसाहेब नागरगोजे, परमेश्वर रावसाहेब नागरगोजे, संपत मुरलीधर सानप, नवनाथ सदाशिव वारे, तुळशीराम भिवसेन खेडकर, पांडुरंग नारायण सांगळे, प्रकाश दशरथ नागरगोजे, इंदुबाई नामदेव नागरगोजे, पदमाबाई भिवसेन खेडकर, शाम संताराम मार्कड, मुरलीधर लक्ष्मण सानप, संभाजी केशव वारे, शिवाजी केशव वारे, बाळासाहेब रमेश वारे, लक्ष्मण काशीनाथ सानप, सुनिल अशोक गोपाळघरे, गणेश बाबासाहेब गोपाळघरे, गोरक्ष सदाशिव वारे, बाबासाहेब किसन नागरगोजे (सर्व रा.माळेगाव चकला, ता.शिरुर) यांनी घरावर दगडफेक करत शिवीगाळ केली. तसेच दोघांनी वाईट हेतूने पदर ओढला. याप्रकरणी कलम 354, 323, 141, 147, 149, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसर्‍या पराभूत गटातील महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की, सरपंचपदासाठी पराभव झाल्यनंतर विजयी गटाने आमच्या घराकडे येत पोर्चमध्ये येवून जोरजोरात घोषणाबाजी केली. गुलाल उधळत घरावर दगडफेक केली. तसेच माझ्या पतीला दिसेल तिथे जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी चकलांबा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मी मोठा माणूस काहीही करील!
-कुंडलिक खांडेंची विरोधी गटाला धमकी; तिघांवर पिंपळनेर पोलीसात गुन्हा दाखल
बीड : मी मोठा माणूस आहे. काहीही करील, खोट्या केसमध्ये अडकवील अशी धमकी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी गावातील ग्रामपंचायतमधील विरोधी गटाच्या पॅनलप्रमुखांना दिली. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात कुंडलिक खांडेंसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेषेराव साहेबराव खांडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बीड तालुक्यातील म्हाळस जवळा येथे सरपंचपदासाठी पॅनल उभा केला होता. तर विरोधी गटाकडून शिंदेगटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचा पॅनल होता. त्यांचा विजय झाल्यानंतर मंगळवारी (दि.20) रात्री 11.30 सुमारास कुंडलिक हरिभाऊ खांडे, गणेश हरिभाऊ खांडे, नामदेव हरिभाऊ खांडे, गोरख रामप्रसाद शिंदे यांनी विजयी निवडणूक मिरवणूक आटोपून आल्यानंतर आम्हाला ग्रामपंचायत निवडणूकीत विरोध का केला? मी खुप मोठा माणुस आहे. तुम्हाला खोट्या केसमध्ये आडकीन  असे म्हणून शिवीगाळ करत घरावर दगडफेक केल्याची फिर्याद दिली आहे. या प्रकरणी कुंडलिक खांडेसस चौघांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात कलम 336, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव हे करत आहेत.

माळापुरीत विजयी, पराभूत गटामध्ये तुफान हाणामारी
-जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार; परस्पर तक्रारीवरुन आर्म अ‍ॅक्टनुसार 20 जणांवर गुन्हा
बीड : तालुक्यातील माळापुरी येथे मंगळवारी (दि.20) रात्रीच्या सुमारास विजयी व पराभूत गट आमने-सामने आल्याने दोघात फ्री स्टाईल हाणामारी झाली. यामध्ये सरपंचासह विरोधी गटातील पराभूत उमेदवारही जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून या प्रकरणी बीड ग्रामीण ठाण्यात आर्मअ‍ॅक्टनुसार 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माळापुरी येथील टिपू सुलतान चौकात ग्रामपंचायत निवडणूकीच्या कारणावरून वाद झाला. यावेळी झालेल्या वादात नवनिर्वाचित सरपंच गट आणि पराभुत गट समोरा-समोर आले होते. यावेळी झालेल्या वादात नवनिर्वाचित सरपंचासह विरोधीगटातील चार ते पाचजण जखमी झाले. या प्रकरणी सरपंच अशोक ढास यांच्या फिर्यादीवरुन नझीब बेग यांच्यासह इतर दहा जणांवर तर पराभूत गटाचे नझीम बेग यांच्या फिर्यादीवरुन सरपंच अशोक ढास यांच्यासह इतर दहा असे वीस जणांवर आर्मअ‍ॅक्टसह 324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास बीड ग्रामीणचे सहायक निरीक्षक योगेश उबाळे करत आहेत.  

नांदुरहवेलीत दोन गटात राडा
-अ‍ॅट्रॉसिटी, अपंग कायदा, प्राणघातक हल्ल्याचा दोन्ही गटातील 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल  
बीड : तालुक्यातील नांदुर हवेली येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी किरकोळ वादातून दोन्ही गट आमनेसामने आले. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी, अपंग कायदा, प्राणघातक हल्ला यासह विविध कलमान्वेय दोन्ही गटातील 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पराभूत गटातील महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी सायंकाळी गावातील शेख शाहेद शेख मुजफ्फर, शेख आमेर अहेमद शेख अन्सार, शेख रियाज शेख रज्जाक, शेख राजु शेख बाबु, शेख शाकेर शेख इसाक, गणेश बुधनर, शेख सिराज शेख रज्जाक, पठाण रियाज अय्युब व इतरांनी आमच्या घरासमोर येवून गुलाल उधळत जातीवाचक घोषणा दिल्या. शेख शाहेद व इतरांनी माझ्याजवळ येवून वाईट उद्देशाने अंगावर गुलाल टाकून हात पकडला. त्यानंतर दारात उभ्या असलेल्या स्कॉर्पिओसह वाहनांची तोडफोड केली. गाडीवर चढून शेख शाकेर, गणेश बुधनर यांनी चार चाकी गाडीच्या काचा फोडल्या व शेख मतीन शेख निसार, पठाण रिझवान अय्युब, शेख मतीन शेख निसार, शेख सिराज शेख रज्जाक, शेख शकील शेख मुनीर व प्रध्युम्न शिवनारायण बुधनर यांनी आमच्या घराच्या खिडक्यांवर, पत्र्यांवर दगडफेक करून काठ्यांनी व दांड्यांनी दारावर मारले अशी तक्रार महिलेने दिली आहे. या प्रकरणी शाहेद पटेल यांच्यासह इतरांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 354, 143, 147, 149, 336, 337, 427, 504 भादवीसह अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शाहेद पटेल यांच्या गटाकडून बुधवारी बीड ग्रामीण पोलीसात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी अ‍ॅट्रॉसिटी, अपंग कायदा, प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी 10 ते 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास उपअधीक्षक संतोष वाळके हे करत आहेत.

पिठ्ठी येथे अंगणवाडी सेविकेला शिवीगाळ
पाटोदा
: ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून एका अंगणवाडी सेविकाला शिवीगाळ केल्याची घटना पाटोदा तालुक्यातील पिठ्ठी येथे बुधवारी (दि.21) घडली. या प्रकरणी पाटोदा पोलीसात तक्रार देण्यात आली आहे.
पाटोदा तालुक्यातील पिठी नायगाव परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून एका अंगणवाडी सेविकेला रस्त्याने जात असताना येथीलच राजेंद्र जगन्नाथ भोंडवे, नितीन राजेंद्र भोंडवे, सचिन राजेंद्र भोंडवे यांनी वाद घालत शिवीगाळ केली. अशी तक्रार पीडितेने पाटोदा पोलीसात दिली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Tagged