भाजपा नेते सर्जेराव तांदळे यांना जीवे मारण्याचा कट

क्राईम बीड

कट रचणार्‍या अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू

बीड : भाजपाचे जिल्हा सरचिटणीस असलेले सर्जेराव तांदळे यांना जिवे मारण्याचा कट रचला जात असल्याचा प्रकार नगर जिल्ह्यातील एका हॉटेलवर घडला. 27 डिसेंबर 2022 रोजी रात्री तीन व्यक्ती सर्जेराव तांदळे यांना जीवे मारण्याबाबत चर्चा करत होते. ही चर्चा तांदळे यांच्या एका समर्थकाने ऐकली. घडलेला प्रकार अतिशय गंभीर असल्याने पोलिसात तक्रार करण्यात आली असून बीड जिल्हा पोलिस प्रशासन गांभीर्याने तपास करत आहे. याप्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. सर्जेराव तांदळे समर्थक संतप्त तेवढेच अलर्ट झाले आहेत.

भाजपा नेते सर्जेराव तांदळे हे स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे कडवे समर्थक म्हणून ओळखले जातात. सर्जेराव तांदळे यांच्या राजकीय आणि सामाजिक कामामुळे त्यांचे बीड जिल्हाच नव्हे तर राज्यभरात समर्थक आहेत. 27 डिसेंबर 2022 रोजी रात्री 8 ते 9 वाजण्याच्या दरम्यान नगर जिल्ह्यातील एका हॉटेलवर बसून अज्ञात तीन व्यक्ती सर्जेराव तांदळे यांना जिवे मारण्याचा कट रचत होते. या तीन व्यक्तीपैकी दोघेजन काळ्यासावळ्या रंगाचे आणि मजबूत बांध्याचे तर तिसरा व्यक्ती मध्यम बांध्याचा होता. भाजपा नेते सर्जेराव तांदळे यांना कुठे व कसे मारायचे, ही त्यांची चर्चा बाजूलाच बसलेल्या एका तांदळे समर्थकाने ऐकली. त्याने याची माहिती सर्जेराव तांदळे यांना दिली. या खळबळजनक प्रकाराने तांदळे कुटुंबीय भयभीत झाले असून बीड येथील भाजपाच्या टीमने तत्काळ पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेऊन त्यांना या प्रकाराची माहिती दिली. पोलीस अधिक्षकांनी गांभीर्याने दखल घेत जीवे मारण्याचा कट रचणार्‍या अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला. ज्या हॉटेलमध्ये कट रचला जात होता, तेथील सिसिटिव्ही फुटेज तपासले जात आहे. पोलिसांनी भाजपा नेते सर्जेराव तांदळे यांना शस्त्रधारी पोलिसाचे संरक्षण द्यावे, अशी मागणी होत आहे.

Tagged