आष्टी तालुक्यातील वाघळूज येथील हृदयद्रावक घटना
आष्टी दि.24 : दीड वर्षापूर्वी दोघांनी आंतरजातीय विवाह केला, मंगळवारी (दि.23) दोघेही कांदे काढण्यासाठी शेतात गेले. मात्र ते घरीच परतलेच नाहीत. म्हणून नातेवाईकांनी शोध घेतला असता रात्रीच्या वेळी तरुणाचा तर आज सकाळी महिलेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही हृदयद्रावक घटना आष्टी तालुक्यातील वाघळूज येथे उघडकीस आली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून अंभोरा पोलीस अधिक तपास करत आहेत.
ईश्वर गुंड (34) आणि ऋतुजा ईश्वर गुंड (26) असे मृत पती-पत्नीची नावे आहेत. आष्टी तालुक्यातील वाघळूज येथील ईश्वर गुंड व ऋतुजा यांचा दीड वर्षापूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. मंगळवारी सकाळी दोघेही शेतात कांदा काढण्यासाठी गेले होते. सायंकाळी दोघेही घरी परतले नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनी शोध घेतल्यानंतर रात्री शेतात ईश्वर गुंड यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तर ऋतुजाचा शोध लागला नाही. दरम्यान, बुधवारी सकाळी शेतातच ऋतुजाचा देखील मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या हृदयद्रावक घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. पतीचा आणि पत्नीचा मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्याने ही आत्महत्या की घातपात अशी चर्चा सुरु झाली आहे. अंभोरा पोलीसांनी घटनास्थळी पाहणी केली. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.