चितेगाव एमआयडीसीमधील एका औषध कंपनी मध्ये १८ कोरोना बाधित

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे मराठवाडा महाराष्ट्र

तालुक्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ११७ वर पोहोचली

पैठण  : पैठण तालुक्यातील चितेगाव एमआयडीसीतील एका औषध कंपनीत 18 कामगार कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे पैठण तालुक्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या 117 वर पोहोचली आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोना काळामध्ये एमआयडीसीतील कंपन्यांना सूट देऊन आरोग्याची योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे आता कोरोनाने आपला मोर्चा औद्योगिक वसाहतींकडे वळवलेला आहे.

ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा फैलाव होऊनही यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी स्थानिक नागरिकांच्या सहभागातून गाव पातळीवर विविध ठिकाणी जनता कर्फ्यू लावलेला आहे. तरी देखील औरंगाबाद शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चितेगाव एमआयडीसीमधील एका औषध कंपनीत जवळपास 18 कामगारांना कोरोनाची लागण झाली.

त्यामुळे या कामगाराच्या संपर्कात किती व्यक्ती आले याबाबत आरोग्य विभागाला शोध मोहिमेसाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे. जिल्हा प्रशासनाने पैठण तालुक्यातील एमआयडीसी परिसरात असलेल्या कंपन्यांना कोरोना काळात काही निर्बंध लावून कंपनी चालू ठेवण्याचा आदेश दिला होता. या कंपनी मधील कामगार औरंगाबाद पैठण परिसरातून दररोज ये-जा करीत होते. या कामगारांची कंपनी परिसरात आरोग्य विभागाने व कंपनी व्यवस्थापनाने योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे या परिसरात रुग्णांची संख्या वाढत असून कागदोपत्री घोडे नाचवणार्‍या आरोग्य विभागाने मात्र वेळ काढू धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे पैठण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान पैठण शहरांमधील कोरोना केअर सेंटर मध्ये 32 रुग्ण ठेवण्याची क्षमता असून सध्या या सेंटर हाऊसफुल झाले आहे.

Tagged