बीड दि.21 : धाराशिव (DHARASHIV) जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ईट येथील जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट शाखेत ठेवीदारांना रक्कम न मिळाल्याने 18 जुलै रोजी वाशी पोलीसात 110 ठेवीदारांनी जवाब नोंदवला. या प्रकरणी अनुरथ बापुराव महाकले यांच्या फिर्यादीवरुन एकूण तीन कोटी 72 लाख 1 हजार 494 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अध्यक्षा अनिता बबनराव शिंदे, बबन विश्वनाथ शिंदे, मनिष बबन शिंदे, योगेश करांडे, अश्विनी सुनिल वांढरे, अशोक गोविंद लवांडे, शिवराज शशिकांत बिरबले, शंकर भास्कर हाडुळे, अमोल नामदेव पवार यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास धाराशिव आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष शेजाळ करत आहेत.
बीड, नेकनूरचा तपास एसआयटी करणार; नंदकुमार ठाकूर यांचे आदेश;
जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत होती, मात्र तपास गतीने व्हावा यासाठी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी गुरुवारी (दि.20) या प्रकरणाच्या तपासासाठी (एसआयटी) विशेष तपास पथक नेमले आहे. या पथकाची जबाबदारी सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्यावर देण्यात आली आहे. बीडसह नेकनूर येथील गुन्ह्याचा तपास आता एसआयटी करणार आहे.
अधिकच्या व्याजाचे अमिष दाखवून जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट बँकेने बीडसह नेकनूर, उस्मानाबादेतील ईट येथील हजारो ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक केली आहे. या प्रकरणी बीड, नेकनूर पोलीस ठाण्यात अध्यक्षा अनिता बबनराव शिंदे, बबनराव शिंदे, मनिष शिंदे, आश्विनी शिंदे, योगेश करांडे आदींवर गुन्हा दाखल आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच अध्यक्षा अनिता शिंदे स्वतः पोलीसांना शरण आल्या, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. सध्या योगेश करांडे पोलीस कोठडीत आहेत. यास पोलीसांनी बीडमध्ये राहत्या घरातून 16 जुलै रोजी अटक केली होती. न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली, 20 जुलै रोजी कोठडी संपल्याने पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आणखी दोन दिवसांची (22 जुलैपर्यंत) वाढीव पोलीस कोठडी सुनावली.
एसआयटीत यांचा समावेश
नेमलेल्या एसआयटीमध्ये सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे, सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव, उपनिरीक्षक भारत बरडे, अंमलदार मुकुंद तांदळे, अभिमान भालेराव, श्रीकृष्ण हुरकुडे, भाऊसाहेब चव्हाण, संजय पवार यांचा समावेश आहे.